कोपा अमेरिका स्पर्धा – प्ले-ऑफ लढतीत पेरुवर 3-2 फरकाने विजय
ब्रासिलिया (ब्राझील) / वृत्तसंस्था
स्ट्रायकर लुईस दियाझच्या दुहेरी गोलमुळे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील प्ले-ऑफ लढतीत कोलंबियाने पेरुवर 3-2 फरकाने विजय संपादन केला. तिसऱ्या स्थानासाठी ही लढत खेळवली गेली.
योशिमार योतूनने 28 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे पेरुने या सामन्यात आघाडी घेतली होती. मात्र, कोलंबियाने 49 व्या मिनिटाला जुआन गुलेर्मो क्वॉड्रडोच्या गोलमुळे बरोबरी प्राप्त केली. नंतर 66 व्या मिनिटाला व्हर्गासच्या पासवर दियाझने आपला पहिला व कोलंबियन संघाचा दुसरा गोल केला. 82 व्या मिनिटाला लॅपाडुलाच्या गोलमुळे पेरुचा संघ बरोबरीत आला. पुन्हा दियाझनेच स्टॉपेज टाईममध्ये चौथ्या मिनिटाला निर्णायक गोल करत कोलंबियाला 3-2 असा निसटता विजय संपादन करुन दिला









