इस्रायलच्या राजदूतांचे विधान – चीन लक्ष्य , भारताला मदत करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट धोकादायक ठरू लागली आहे. याचदरम्यान काही देश या विषाणूच्या उत्पत्तिवरून एका दिशेने इशारा करत आहेत. सर्वप्रथम अमेरिका, मग ऑस्ट्रेलिया आणि आता इस्रायलनेही नाव न घेता चीनला लक्ष्य केले आहे. कोरोना विषाणू हा अत्यंत संशयास्पद प्रकारचा आहे. हा विषाणू आम्हाला वारंवार आणि वेगवेगळय़ा स्वरुपात येऊन चकित करत असल्याचे उद्गार भारतातील इस्रायलचे राजदूत रॉन माल्का यांनी काढले आहेत.
महामारीच्या पहिल्या लाटेत इस्रायलची स्थिती बिघडत असताना भारताने केलेली मदत आम्ही कधीच विसरू शकत नाही. भारत आणि इस्रायलची मैत्री अजोड आहे. ज्या गोष्टींमध्ये आम्हाला प्राविण्य आहे, त्यांची देवाणघेवाण आम्ही करतो आणि हे काम यापुढेही सुरूच राहणार आहे. स्वतःच्या लोकांची जीव वाचविण्याची ही लढाई असल्याचे माल्का यांनी म्हटले आहे.
भारतात मदतीचे आश्वासन
या संकटकाळात इस्रायलचे लोक आणि तेथील सरकार भारताच्या लोकांना मदत करू इच्छितात. सर्वोत्तम वैद्यकीय उपकरणे आम्ही भारताला पुरवत आहोत. इस्रायलमधील खासगी कंपन्या देखील उपकरणे भारतात पाठवत आहेत असे माल्का यांनी सांगितले आहे.
विषाणूबद्दल संशय
हा विषाणू अत्यंत संशयास्पद प्रकारातील आहे. आम्ही याच्या तावडीत वारंवार सापडत आहोत. इस्रायलने या विषाणूच्या तीन लाटांना तोंड दिले आहे. ही महामारी कुठे तरी घडलेल्या चुकीच्या दिशेने इशारा करत आहे. सर्व लोकांना लस उपलब्ध झाल्यास स्थिती सुधारणार आहे. भारत देखील या महामारीच्या तडाख्यातून लवकरच बाहेर पडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









