ब्रिटनमध्ये सर्वेक्षण – विषाणूपासून सुरक्षा प्राप्त – लोकांना आले विविध प्रकारचे अनुभव
वृत्तसंस्था / लंडन
कोरोनावरील लस टोचून घेणाऱया लोकांमध्ये काही अन्य आजारांशी संबंधित समस्या दूर झाल्याची बाब समोर आली आहे. ब्रिटनमधील सर्वेक्षणानुसार लस घेतल्यावर काही जणांचे कित्येक वर्षे जुने दुखणे गायब झाले तर कुणाच्या अंगाला येणारी खाज दूर झाली आहे. एका महिलेने स्वतःच्या पतीचा सुमारे 15 वर्षे जुना स्लीप डिसऑर्डर बरा झाल्याचा दावा केला आहे. विषाणूमुळे संक्रमित होत बरे झाल्यावर प्रकृती पूर्वीपेक्षा उत्तम स्थितीत असल्याचा दावा काहीजणांनी केला आहे.
इंग्लंडच्या ग्रेटर मँचेस्टरमध्ये राहणाऱया 72 वर्षीय जोएन वेकफील्ड यांची मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘गुडघे प्रत्यारोपण’ शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांना नीट चालताही येत नव्हते. पेशींमध्ये संसर्ग झाल्याने त्यांना तीव्र वेदना व्हायच्या. फेब्रुवारीच्या प्रारंभी त्यांना ऍस्ट्राजेनेकाच्या लसीचा पहिला डोस मिळाला. दुसऱया दिवशी सकाळी उठल्यावर पायांमधील वेदना गायब होत्या. मला माझे पायही दुमडता येत नव्हते. पण आता मी पाय सरळ करू शकते, लवकरच मी कामावर परतू शकेन, असे उद्गार जोएन यांनी डेली मेलशी बोलताना काढले आहेत.
चक्कर येणे, थकव्याचा त्रास दूर
मागील महिन्यात एका ब्रिटिश वृत्तपत्रात डॉक्टर एली कॅनन यांनी एका विचित्र प्रकरणासंबंधी लिहिले आहे. एका व्यक्तीला लाइम आजार होता. डॉक्टरांनुसार कोविड लस मिळाल्याच्या काही दिवसांनी दीर्घकाळापासून असलेली थकव्याची त्याची समस्या दूर झाली आहे. 25 वर्षांपासून वर्टिगोची असलेली समस्या लस घेतल्याच्या 4 दिवसांनी गायब झाल्याचा दावा एका महिलेने केला आहे. 15 वर्षांपूर्वी स्लीप डिसऑर्डरचे निदान झालेली व्यक्ती लस टोचून घेतल्यावर पहिल्यांदाच पूर्ण झोप घेऊ शकल्याचे त्याच्या पत्नीने म्हटले आहे.
लसींच्या प्रभावावरील संशोधन
लसींचे अशाप्रकारचे प्रभाव वैज्ञानिकांसाठी निश्चितच नव्हे नाहीत. दशकांपासून त्यांना ‘नॉन स्पेसेफिक इफेक्ट्स’च्या वर्गवारीत नोंदविण्यात येत आहे. 70 आणि 80 च्या दशकात देवी रोगावरील लसीने पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये मुलांच्या मृत्यूचा धोका एक-तृतीयांशने कमी केला होता. पोलिओ लसीमुळे फ्ल्यू तसेच अन्य संसर्गांपासून 80 टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळत असल्याचे रशियाच्या वैज्ञानिकांना आढळून आले होते. ग्रीक आणि डच संशोधकांनी बीसीजी लसीमुळे वृद्धांमध्ये सर्वसाधारण संसर्गाचा धोका कमी झाल्याचे पुरावे मिळविले आहेत. क्षयरोगाची लस कर्करोग तसेच विस्मृतीच्या आजारांमध्येही उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.
इम्युनोलॉजिस्ट यांचे म्हणणे काय?
युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टरमधील इम्युनोलॉजिस्ट प्राध्यापिका शीना क्रूकशँक यांचा या दाव्यांवर मात्र विश्वास नाही. आजाराबद्दल आमच्या भावनिक प्रतिसादात याचे कारण लपलेले असू शकते. महामारीमुळे मोठा ताण आला असून अशा स्थितीत आरोग्यावरील त्याच्या प्रभावाकडे दुर्लक्ष केले जाते. वाढलेल्या स्ट्रेस हार्मोन्समुळे इम्युन पेशींची संसर्गाशी लढण्याची शक्ती कमी होते. लस अनेक लोकांमधील ताण कमी करणार असल्याने त्याचा प्रभाव रोगप्रतिकारक क्षमतेवर दिसून येणार असल्याचे शीना यांचे म्हणणे आहे.









