बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराला गती आली असून सर्वच उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. विकेंड कर्फ्यू असल्याने सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. अशातच काही कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी उमेदवारांना फिरावे लागले. कोरोना नियमावलीचे पालन करावे लागत असल्याने त्यांना प्रचार करताना कसरत करावी लागत आहे.
महापालिका निवडणूक रिंगणात 385 उमेदवार असून सर्वांनीच प्रचारासाठी कंबर कसली आहे. कोरोनाची धास्ती आणि विकेंड कर्फ्यू अशा दोन्ही अडचणींना सामोरे जात प्रचार करावा लागत असल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांची कसरत वाढली आहे. प्रचारासाठी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यात येत आहेत. काहीनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दुसऱया दिवशीपासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे वॉर्डातील मतदारांची भेट घेण्याची पहिली फेरी पूर्ण केली आहे. प्रचार करण्यास केवळ सात दिवसाचा अवधी मिळाला असून गर्दी न करता आणि सामाजिक अंतर राखून प्रचार करण्याची अट असल्याने उमेदवारांचा कस लागला आहे.
काही उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मिडियाचा आधार घेतला असून, विविध प्रकारच्या क्लुप्त्या प्रचार करण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची भर पडली असल्याने अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी खुपच प्रयत्न करावे लागत आहेत. राष्ट्रीय पक्षांची आश्वासने आणि आमिषाला सर्वसामान्य मतदार बळी पडतील अशी भीती असल्याने वॉर्डातील समस्या महत्त्वाच्या असल्याची आठवण सामान्य नागरिकांना अपक्ष उमेदवार करून देत आहेत. तसेच भूलथापांना बळी न पडता मतदान करा असे आवाहन आवर्जुन करण्यात येत आहे.
सध्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची गर्दी असल्याने प्रत्येक कोपऱयावरील चर्चेत कोण निवडून येणार असा सूर उमटत आहे. राष्ट्रीय पक्षांनी केलेल्या घोषणा आणि सर्वसामान्यांना भेडसावणाऱया समस्या याबाबत चर्चा घडत आहेत.









