भरघोस मतांनी निवडून देण्याचे वॉर्ड क्र. 50 मधील संघटनांचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
वडगाव परिसरात विखुरलेल्या विविध उपनगरांसह नव्या वसाहतींचा समावेश वॉर्ड क्र. 50 मध्ये झाला आहे. या वॉर्डमधून निवडणूक लढविण्यासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. या वॉर्डमध्ये मराठी भाषिकांमध्ये एकमत न झाल्याने खुला ठेवण्यात आला आहे. मात्र गीता मनोहर हलगेकर यांना विविध मंडळांनी व संघटनांनी पाठिंबा व्यक्त केला असून, वॉर्डातील नागरिकांनी गीता हलगेकर यांनाच म. ए. समितीची उमेदवारी द्यावी अशा मागणीचे पत्र दिले आहे.
वॉर्ड क्र. 50 मध्ये 2 राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आणि चार अपक्ष उमेदवार आहेत. येथील पंच मंडळींनी तसेच परिसरातील रहिवाशांनी गीता हलगेकर यांना मराठी भाषिकांतून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र त्यांना डावलून अन्य उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे येथील वडगाव परिसरातील रहिवाशांनी आक्षेप घेतला असून, याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सध्या वॉर्डातील जनतेचा कल गीता मनोहर हलगेकर यांच्या बाजूने आहे. सर्व गल्ल्यांमधून व परिसरातून हलगेकर यांना पाठिंबा मिळत आहे. मराठी भाषिकांच्या एकीसाठी व महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता कायम राखण्यासाठी गीता मनोहर हलगेकर यांच्या पाठिशी राहणे आवश्यक आहे. वॉर्डातील मराठी भाषिकांचे हित लक्षात घेऊन पाठिंबा जाहीर करीत असल्याचे पत्रक सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, श्री लोकमान्य टिळक सेवा संघटना, पाटील गल्ली यरमाळ रोड, वडगाव या संघटनेने दिले आहे. तसेच विष्णू गल्ली येथील शेती सुधारणा युवक मंडळ आणि पाटील गल्लीतील श्री शिव युवक मंडळ आणि माधवपूर वडगाव प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्यावतीने पाठिंबा पत्र देण्यात आले आहे. वॉर्डातील सर्व नागरिकांनी गीता मनोहर हलगेकर यांनाच आपले बहुमोल मत देऊन विजयी करावे असे आवाहन मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.









