प्रतिनिधी/ कोरेगाव
सातारा-कोरेगाव रस्त्यावर मंगळवारी रात्री 8.10 च्या सुमारास भरधाव ट्रकने समोरुन येणाऱया मोटारसायकलस्वारास जोरदार धडक दिल्याने महेंद्र उत्तम निदान (वय 44) हे जागीच ठार झाले. निदान हे कोरेगावातील कापड व्यावसायिक होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शासकीय धान्य वाहतुकीचा ट्रक क्र. एम. एच. 11-एफ-4634 हा कोरेगावहून साताऱयाकडे निघाला होता. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात चालकाने विरुध्द दिशेला जाऊन समोरुन येणाऱया मोटारसायकल क्र. एम. एच. 11-बी. एक्स.-1498 ला जोरदार धडक दिली. या अपघातात महेंद्र निदान यांचा जागीच मृत्यु झाला.
याप्रकरणी सुनील निदान यांनी फिर्याद दिली असून, कोरेगाव पोलीस ठाण्यात मालट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे तपास करत आहेत.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करा
सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम घेतलेल्या ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच कोरेगावातील रेल्वे स्टेशन ते आझाद चौक या दरम्यान एक हजारांहून अधिक खड्डे पडले आहेत. खड्डय़ामुळेच महेंद्र निदान यांचा अकाली मृत्यु झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. याप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.









