पालकमंत्री उदय सामंत यांचे महावितरणला आदेश
जिल्हा व्यापारी महासंघाची यशस्वी शिष्टाई
प्रतिनिधी / कुडाळ:
सिंधुदुर्गातल्या एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा मला सांगितल्याशिवाय खंडित करायचा नाही. कोरोना टाळेबंदीमुळे आधीच अडचणीत आलेल्या व्यापाऱयांनी वीजबिल भरण्याबाबत दिलेल्या प्रस्तावानुसार सर्वांना हप्ते बांधून द्या, असे स्पष्ट निर्देश सिंधुदुर्ग दौऱयावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी महावितरणला दिले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वीज कंपनीने थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सुरू केलेल्या कारवाईला पायबंद बसून कोरोनामुळे आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱया जिल्हय़ातील एक लाखाहून अधिक वीज ग्राहकांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर होणार असल्याचे जिल्हा व्यापारी महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले.
कोरोना टाळेबंदीच्या काळात दिलेली सरासरी वीज देयके आपणास मान्य नाहीत. कोरोना काळात लागू केलेली वीज दरवाढ परत घ्या. कोरोना काळातील वापरलेल्या विजेच्या रकमेव्यतिरिक्त अन्य सर्व कर, आकार व व्याज माफ करा. कोरोना काळातील एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यातील वीज देयके ही विवादित बाब म्हणून कल्पून ऑक्टोबरपासूनची देयके स्वीकारा, टाळेबंदीच्या काळातील वीज देयके भरण्यासाठी हप्ते बांधून द्या, आदी मागण्यांसाठी व्यापारी महासंघाने शासन, प्रशासन व कंपनीकडे अर्ज व निवेदने सादर केली होती. त्याबाबत सकारात्मक
प्रतिसाद न मिळाल्यास एक मार्चनंतर संवैधानिक मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यान, वीज कंपनीने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केल्याने ग्राहकांत अस्वस्थता होती.
या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हा दौऱयावर आलेल्या पालकमंत्री सामंत यांची व्यापारी महासंघाने भेट मागितली होती. सामंत यांनीही या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अध्यक्ष नितीन तायशेटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाह नीलेश धडाम, द्वारकानाथ घुर्ये, अशोक गाड, संजय भोगटे, राजन नाईक, कुडाळ व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, गोविंद सावंत, नितीश म्हाडेश्वर, भूषण मठकर, प्रसाद शिरसाट, शार्दुल घुर्ये, अनिकेत नेवाळकर, जिल्हा डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनचे विवेक नेवाळकर आदी सदस्यांसह महासंघाच्या शिष्टमंडळाने कुडाळ येथे पालकमंत्र्यांची भेट घेऊन आपले गाऱहाणे मांडले. सामंत यांनीही व्यापाऱयांच्या रास्त मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्याची तयारी दर्शवत मोबाईलवरून वीज अधिकाऱयांना कोणाचाही वीजपुरवठा खंडित न करण्याचे आणि थकित रकमेबाबत हप्ते बांधून देण्याचे आदेश दिले.
महावितरणच्या अधिकाऱयांची भेट घेणार
दरम्यान, पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार थकीत वीजबिलप्रश्नी हप्ते बांधून घेणे व अन्य बाबींबाबत जिल्हास्तरावर एकच नियोजित धोरण आखून घेण्यासाठी महासंघामार्फत महावितरणच्या अधिकाऱयांची भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही तायशेटे यांनी दिली.









