उपचाराचे निमित्त – ओली यांची तक्रार करणार
काठमांडू
नेपाळचे माजी पंतप्रधान आणि जनता समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते बाबूराम भट्टराई एक आठवडय़ासाठी भारतात असतील. भट्टराई भारतात स्वतःवर उपचार करवून घेणार आहेत. पण माजी पंतप्रधान या दौऱयात भारतीय नेते अधिकाऱयांना भेटणार असल्याचे समजते. विद्यमान पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारतासोबत शत्रुत्व पत्करल्याने भट्टराई यांचा हा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्लीत येण्यापूर्वी भट्टराई यांनी येथील नेपाळच्या दूतावासाला एक किंवा दोन दिवस भारतात राहणार असल्याचे कळविले आहे. पण उर्वरित दौऱयाविषयी कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. भट्टराई यांच्या दौऱयामागे राजकीय कारण नसल्याचा दावा त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र यादव यांनी केला आहे. चालू महिन्यात पक्षाचे नेते महंत ठाकूरही दिल्लीत आले होते आणि त्यांनी अधिकाऱयांची भेट घेतली होती. भारताचा निवडणूक किंवा सभागृह पुन्हा कार्यरत करण्यासंबंधी भारताची भूमिका नेपाळच्या नेतृत्वाला ज्ञात आहे. याचमुळे भट्टराई यांच्याकडे सांगण्यासारखे काही अधिक नसले तरीही ते ओली देशाची राज्यघटना आणि लोकशाहीला नुकसान पोहोचवित असल्यासंबंधी तक्रार करू शकतात. यापूर्वी माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ देखील दिल्लीत पत्नीवरील उपचारासाठी आले होते. या भेटीदरम्यान त्यांनी काही भारतीय अधिकाऱयांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.









