वारंवार मनपाला कळवूनसुद्धा दुरुस्तीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
यश ऑटो व कॉलेज रोड परिसरात पाण्याच्या नळाला डेनेज मिश्रित पाणी आल्याने येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार महानगरपालिकेला कळवूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात बनले.
कॉलेज रोड व यश ऑटो शेजारच्या परिसरात गेल्या पंधरा दिवसात डेनेज मिश्रित पाणी येत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. या परिसरात 6 दिवसांतून एकदा पाणी सोडले जाते. त्यातच अशाप्रकारचे मिश्रित पाणी आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याबाबतची तक्रार महापालिकेच्या कर्मचाऱयांकडे तसेच संबंधित अधिकाऱयांकडे केली असूनही त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार संबंधित अधिकाऱयांकडे अरुणा शामराव किल्लेकर यांनी पाण्यासाठी तक्रार केली असता. त्यांनाही उद्धट उत्तरे मिळत आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यातच अशा मिश्रित पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्मयाचे बनले आहे. तातडीने ही दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.









