क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज बुधवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर केरळ ब्लास्टर्स आणि बेंगलोर एफसी यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांची गुणतक्त्यातील स्थिती बघता त्यांच्यासाठी लढतीचे महत्व आणखी वाढले आहे. दोन्ही संघांना कामगिरीला कलाटणी देण्याची आणि पुनरागमन करण्याची गरज आहे.
केरळ ब्लास्टर्सला ईस्ट बंगालविरूद्ध अखेरच्या क्षणी भरपाई वेळेतील गोलमुळे बरोबरीवर समाधान मानावे लागले. या निराशेतून सावरण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आघाडी अबाधित राखण्यात येत असलेले अपयश त्यांच्यासाठी चिंतेचा मुद्दा आहे. पहिला गोल करूनही त्यांना आतापर्यंत दहा गुणांना मुकावे लागले आहे.
बेंगलोरचा संघ चांगला आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत. परिस्थिती वेगळी असली तरी आम्ही नेहमीच्या सामन्यासारखीच तयारी केली आहे. आक्रमणात आणि डावपेचात्मक आघाडीवर सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ब्लास्टर्सचे प्रशिक्षक व्हिकुना म्हणाले. व्हिकुना यांच्यासमोर अनेक समस्या आहेत. त्यांच्या संघाला मोसमात सर्वाधिक 20 गोल पत्करावे लागले आहेत.
बेंगलोर एफसीची हंगामी प्रशिक्षक नौशाद मुसा यांनी संघाची पाच सामन्यांची अपयशी मालिका खंडित करण्याचे ध्यैय ठेवले आहे. यात त्यांना चार पराभव पत्करावे लागले आहेत. बेंगलोरला आठ सामन्यात क्लीन शीट राखता आलेली नाही. त्यामुळे बचाव फळीच्या कामगिरीत सुधारणा होईल अशी अपेक्षा मुसा यांनी बाळगली आहे. त्यांना आत्ताच 16 गोल पत्करावे लागले आहेत. संघामध्ये आता बरीच सकारात्मकता निर्माण झाली आहे. आम्हाला पाच ते सहा दिवस चांगला सराव करता आला. ज्या गोष्टी अपेक्षेनुसार घडत नाहीत, त्या तशा व्हाव्यात म्हणून आम्ही मेहनत घेतली, असे मुसा म्हणाले.
मुसा यांच्या संघाला मध्यफळीतील प्रभावी खेळाडू डिमास देल्गादो याच्या गैरहजेरीत खेळावे लागेल. तो सध्या कौटुंबिक कारणास्तव स्पेनला गेला आहे, पण संघाकडे त्याची उणीव भरून काढण्याची क्षमता असल्याचा मुसा यांना विश्वास आहे.









