भंडारी समाज अध्यक्ष अशोक नाईक यांचा सवाल
प्रतिनिधी /पणजी
आदरातिथ्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या गोमंतकीयाच्या दारात कुणीही पाहुणा आला तर त्याला परत पाठविणे हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी समाजाच्या कार्यालयात येण्याची सदिच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते आले. आम्ही त्यांचे स्वागत केले. मनमोकळेपणाने बातचित केली. त्यात गैर काहीच नाही. अन्य कोणत्याही पक्षाचा नेता-मुख्यमंत्री आला असता तरी त्याचेही अशाच प्रकारे स्वागत केले असते. मात्र त्या गोष्टीचा एवढा बाऊ करत समाज समितीवर दोषारोप करून भाजपमधील दोन बडय़ा नेत्यांनी स्वतःची मानसिकता दर्शविली आहे. दुःखद प्रकार म्हणजे दोघेही स्वतः भंडारी समाजीतीलच आहेत, अशी टीका समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी केली आहे.
निवडणूक अद्याप जाहीर सुद्धा झालेली नाही. आमदारांची निवडही झालेली नाही. त्यामुळे थेट मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करणे अपरिपक्वतेचे लक्षण ठरू शकते. आम्ही केजरीवाल यांच्याशी केवळ चर्चा केली. कोणतीही मागणी केली नाही आणि त्यांनीही काहीच जाहीरही केलेले नाही. केवळ समाजाला शुभेच्छा व्यक्त केल्या. अशावेळी त्या विषयाचा एवढा बाऊ करण्याचे कारण अनाकलनीय आहे, असे नाईक म्हणाले.
यापूर्वी आम्ही जो पक्ष भंडारी समाजाला सर्वाधिक जागा देईल त्याला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले होते. त्या निकालावर आधारून नंतर मंत्री किंवा मुख्यमंत्रीपद मागता येणार आहे. परंतु या वक्तव्यातून गैरअर्थ काढून भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी स्वतःच्या समाजावरच टीकास्त्र सुरू केले ही खरोखरच खेदाची बाब आहे, असे नाईक यांनी सांगितले.
गोव्यात सध्या प्रत्येक पक्षात भंडारी समाजाचे नेते आहेत आणि येत्या निवडणुकीनंतरही ते कमी जास्त प्रमाणात असणार आहेत. परंतु वेगवेगळ्या पक्षांचे असल्यामुळे ते सर्वजण एकत्र येणे अशक्य आहे. एखाद्या पक्षात सर्वाधिक भंडारी नेते असतील तरच आम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकतो. मग तो भाजप असो वा आप किंवा अन्य कोणताही पक्ष, असे नाईक म्हणाले.
भंडारी प्राबल्य मतदारसंघात समाजाचाच उमेदवार हवा
एवढी वर्षे भंडारी समाजाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर झाला. कोणत्याही पक्षाने प्राधान्य दिले नाही, समाजाचे कोणतेही प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळे आता आम्ही, भंडारी समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात समाजाचाच उमेदवार असावा, एवढीच अल्प मागणी केली आहे. त्यात मये, मांद्रे, शिवोली, कुडचडे, यासारख्या चार ते पाच मतदारसंघांचा समावेश होतो. आम्ही वेर्णा, बाणावलीची मागणी केलेली नाही, असे नाईक यांनी सांगितले.
सोपटेंनी अभ्यासपूर्ण बोलावे
दरम्यान, भंडारी समाज कार्यालयास भेट देणारे केजरीवाल हेच पहिले मुख्यमंत्री असल्याचा पुनरुच्चार नाईक यांनी केला. 1991 मध्ये रवी नाईक मुख्यमंत्रीपदी असताना समाजाकडे विद्यमान कार्यालय नव्हते. हे कार्यालय 2003 मध्ये विकत घेतले होते. परंतु दयानंद सोपटे यांना हा इतिहास कदाचित माहित नसावा, कारण त्यांचा बोलविता धनी भाजप आहे. भंडारी समाजात दुफळी माजविणे हे भाजपचे षडयंत्र आहे. त्याला आमचेच नेते बळी पडतात, अशी खंत अशोक नाईक यांनी व्यक्त केली.









