हिंदुत्ववादी संघटनांकडून शाही मशिदीवर जलाभिषेकाची घोषणा
वृत्तसंस्था/ मथुरा
उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक नजीक आला असताना कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा तापला आहे. आज म्हणजेच 6 डिसेंबर रोजी शाही मशिदीवर जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या घोषणेनंतर कृष्ण जन्मभूमी क्षेत्राल छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. प्रशासन आणि पोलीस अलर्ट मोडवर आहेत. कुठल्याही प्रकारचा तणाव रोखण्याची पूर्ण तयारी असून देखरेखीसाठी ड्रोन तैनात करण्यात आले आहेत.
हिंदुत्ववादी संघटनांच्या घोषणेनंतर उत्तरप्रदेशातील मथुऱयामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान आणि शाही ईदगाह मशिदीच्या आसपासच्या भागाला छावणीत रुपांतरित करण्यात आले आहे. मथुऱयासह अन्य अनेक जिल्हय़ांमधून सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान भागात पोलीस आणि गुप्तचर विभागाच्या पथकाची करडी नजर आहे.
कानाकोपऱयात बंदोबस्त
श्रीकृष्ण जन्मस्थानाला लागून असलेल्या शाही ईदगाह मशिदीवर 6 डिसेंबर रोजी भगवान श्रीकृष्णाच्या नावाने जलाभिषेक केला जाणार असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांकडून म्हटले गेले होते. सोशल मीडियावर बालगोपाळाच्या जलाभिषेकाची माहिती आगीप्रमाणे फैलावली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सौहार्द राखण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. श्रीकृष्ण जन्मस्थान आणि शाही ईदगाह मशिदीला लागून असलेल्या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी बॅरिकेडिंग करून वाहनांची झडती घेतली जातेय.
सुरक्षा दलांना पाचारण
मथुऱयासह अन्य जिल्हय़ांमधूनही सुरक्षा दलांना बोलाविण्यात आले. बाहेरून येणाऱया आणि बाहेर जाणाऱया लोकांची कसून झडती घेतली जात आहे. पूर्ण तपासणीनंतरच श्रीकृष्ण जन्मस्थान आणि परिसरात प्रवेश दिला जातोय. वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी उपाययोजना
श्रीकृष्ण जन्मभूमीनजीकच्या मशिदीच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या भागाला 4 सुपर झोन आणि 8 सेक्टर्समध्ये विभागण्यात आले आहे. 3 हजार पोलीस आणि अन्य दलांच्या जवानांना तैनात करण्या आले आहे. मशिदीच्या सर्व प्रमुख प्रवेश मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आल्याची माहिती शहराचे पोलीस अधीक्षक एम.पी. सिंह यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
6 डिसेंबर रोजी बाबरी मशिद पाडावाच्या तारखेला मथुऱयामध्ये चार हिंदुत्ववादी संघटना अखिल भारतीय हिंदू महासभा, श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास, नारायणी सेना आणि श्रीकृष्ण मुक्ती दलाने शाही ईदगाह मशिदीत जलाभिषेक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेने परिसरात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करण्याची अनुमती प्रशासनाकडे मागितली होती. पण प्रशासनो या संघटनांना अनुमती देण्यास नकार दिला आहे.









