पथदिव्यांना पालिका देणार विद्युत कनेक्शन
प्रतिनिधी / सातारा
अनेक दिवसांपासून अजिंक्यतारा किल्ल्याचा विकास होत नव्हता. परंतु आता या किल्ल्याच्या विकासाच्या हालचाली वाढल्या आहेत. किल्ल्याच्या मार्गावर असणाऱ्या पथदिव्यांना विद्युत कनेक्शन नव्हते. परंतु आता पालिकेने कनेक्शन देण्याचा विषय मंजूर केला आहे. खासदार उदयनराजेंच्या आदेशानुसार पालिका कामाला लागली असून अजिंक्यतारा किल्ल्याचा मार्ग शिवजयंतीच्या दिवशी प्रकाशमान होणार आहे.
गेल्या तीन वर्षापासून किल्ले अजिंक्यताऱ्याच्या स्ट्रीट लाईटचा प्रश्न प्रलंबित आहे. पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण यांनी पाठपुरावा करुन आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडून स्ट्रीट लाईटचे काम मंजूर करुन आणले. स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या. परंतु स्ट्रीट लाईटला कनेक्शन द्यायचे कोणी, बील भरायचे कोणी हा प्रश्न असल्याने स्ट्रीट लाईट बसूनही बल्ब लागत नव्हते. आता सातारा नगरपालिकेच्या हद्दीत किल्ला आल्याने नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 11 हा किल्ले अजिंक्यतारा रस्त्यावर पालिकेमार्फत विद्युतीकरण करणे, वीज कनेक्शन देणे हा होता. त्यामुळे पालिका विद्युत कनेक्शन देण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. खासदार उदयनराजे यांच्या सुचनेनुसार लवकरच विद्युत कनेक्शन देवून स्ट्रीट लाईट लावण्यात येणार आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी दिली.
स्ट्रीट लाईट सुरु करावी
2018 साली अजिंक्यतारा किल्ला ते गोडोली असे आमदार शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून डीपीडीसीतून स्ट्रीट लाईटची मंजूरी घेतली होती. या मार्गावर 94 खांब टाकले. परंतु विद्युत कनेक्शनअभावी ते बंद होते. पालिकेला कनेक्शन देण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी हद्दीच्या बाहेर असल्याचे सांगत हात झटकले होते. आता हद्दवाढीनंतर किल्ला हद्दीत आला तरी पालिकेने काम तातडीने पूर्ण करावे. आशुतोष चव्हाण, पंचायत समितीचे सदस्य
पालिकेने स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात
ऐतिहासिक अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी वसलेल्या साताऱ्याला मोठे वरदान लाभलेले आहे. छत्रपतींचा हा अजिंक्यतारा लाईट आणि रस्त्यापासून दुर्लक्षित आहे. सातारा जिल्हा परिषदेच्यावतीनेग्न दि. 25 ऑक्टोबर 2018 ला रस्ता व रिटेनिंग वॉल कंपाऊड यासाठी वर्कऑर्डर निघाली होती. मात्र, आता या स्ट्रीट लाईट बंद आहेत. रस्त्याची दूरावस्था आहे. दि. 29 जानेवारीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन दिले होते. पालिकेने स्ट्रीट लाईट सुरु कराव्यात.








