स्टेशनरी साहित्य मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसमोर अडचणी
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात सध्या चालू असलेल्या राज्यस्तरीय संचारबंदीचे काही परिणाम हळहळू दिसू लागले असून कॉलेजच्या विद्यार्थी वर्गास वहय़ा, पुस्तके, तसेच पेन व इतर साहित्य मिळेनासे झाले आहे. विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिकवणी चालू असून त्या शिक्षक वर्गाकडून वहय़ा पुस्तके व इतर वस्तू आणण्याची सूचना केली जाते. प्रत्यक्षात स्टेशनरीची दुकाने बंद असल्यामुळे ते साहित्य मिळणे आणि साधे पेनही उपलब्ध होणे कठीण झाले आहे. सरकारने फक्त अत्यावश्यक दुकानेच खुली ठेवण्यास अनुमती दिली आहे. त्यात स्टेशनरीची दुकाने येत नसल्याने ती बंद आहेत.
अनेक शहरातील मुख्य मार्केट बंद असल्यामुळे ग्राहकांना भाजीपाला, फळे मिळवण्यासाठी वणवण फिरावे लागत असून मार्केटच्या परिसराबाहेर इतर ठिकाणी असलेल्या दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे. मासळी मार्केट बंद असल्यामुळे ग्राहकांची अडचण होत आहे. मासळी मिळण्यासाठी अनेकजण भटकताना दिसत असून ती मिळत नसल्याने अनेकांनी सध्या अंडय़ांवर भर दिला आहे. ज्या ठिकाणी भाजी, फळे उपलब्ध आहेत तेथे त्याचे दर मात्र जादा आकारण्यात येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत.
गेल्या रविवारपासून गोव्यात 15 दिवसांची संचारबंदी लावण्यात अली असून ती 24 मे सकाळी 6 वा. पर्यंत रहाणार आहे. सोमवारी, मंगळवारी वाहनांच्या वर्दळीत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तथापि नेहमीची वाहनांची वर्दळ मात्र दिसत नाही.
सीमेवरून गोव्यात प्रवेश करणाऱयांची कडक तपासणी सुरू आहे. परंतु गोव्यात अंतर्गत फिरणाऱयांची तेवढी कडकपणे चौकशी होत नसल्याचे समोर येत आहे. सरकारी कार्यालये चालू असल्याने तेथील कर्मचारी येण्या जाण्यासाठी वाहने काही प्रमाणात वाढणार हे साहजिकच आहे. त्यामुळे कडक संचारबंदी आहे, असे जाणवत नाही. अनेक ठिकाणी पोलीस तैनात आहेत खरे, परंतु कडक उन्हामुळे त्यांनाही भर रस्त्यात उभे राहून प्रत्येक वाहनाची, चालकांची चौकशी करणे शक्य होत नाही. दुकाने व इतर आस्थापने बंद असून खासगी बसगाडय़ा देखील प्रवासी नसल्याने ठप्प झाल्या आहेत. कदंबच्या बसगाडय़ा नियमित मार्गावर चालू असून त्यांच्या आधारे सरकारी कर्मचारी ये जा करीत आहेत. किंवा त्यांना स्वतःचे वाहन वापरून कामाला यावे लागत आहे. त्यामुळे दिवसा सौम्य असलेली संचारबंदी रात्री मात्र वाहने नसल्याने कडक भासत आहे.
अनेक भागात भाजीचा तुटवडा
कर्नाटकातील लॉकडाऊनचा गोव्यातील भाजीपाला, फळे पुरवठय़ावर परिणाम झाला असून राज्यातील अनेक भागात भाजीचा तुटवडा भासत आहे. गोव्यातील सर्व भाजी प्रामुख्याने बेळगावातून येते. तेथील घाऊक विक्रेत्यांना दुसऱया ठिकाणी हलवण्यात आले असून सकाळी 6 ते 10 अशी वेळ भाजी खरेदी विक्रीसाठी देण्यात आली आहे. त्या वेळेत शेतकरीवर्गाकडून भाजी खरेदी करणे व ती पुन्हा गोव्यासह इतर व्यापाऱयांना विकणे शक्य होत नाही. गोव्यातील भाजी व्यापाऱयांनाही त्या मर्यादित वेळेचा फटका बसतो. शिवाय कर्नाटक सीमा बंद झाल्याने तेथे अडवणूक होते म्हणून त्यांनी भाजी व्यापार बंद केल्याचे वृत्त आहे.









