प्रतिनिधी /धारबांदोडा
पोखरमळ काले येथे रेल्वेच्या धडकेने बिबटय़ा दगावल्याची घटना गुरुवारी रात्री साडेसातच्या दरम्यान घडली आहे. मोले वन्यजीव विभागाचे वनाधिकारी सिद्धेश नाईक यांनी याला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दगावलेला बिबटय़ा ही मादी असून ती अंदाजे तीन चार वर्षांची असल्याची शक्यता असून ती गरोदर होती. घटनेची माहिती मिळताच कुळे वनविभाग व मोले वन्यजीव विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. बिबटय़ा मागच्या बाजूने रेल्वेला धडकल्याची शक्यता असून बिबटय़ाची शेपटी कट झालेली आहे. रेल्वे कर्मचाऱयांच्या लक्षात सदर घटना आल्यानंतर त्यांनी बिबटय़ाला रेल्वे रुळावरून बाजूला काढले व वनविभागाला माहिती देण्यात आली.
ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तिथे रेल्वे मार्गाचे लहान वळण आहे. त्यामुळे बिबटय़ा रेल्वे मार्ग ओलांडताना कदाचित रेल्वे इंजिनची लाईट बिबटय़ावर पडल्यानंतर बिबटा गोंधळला असावा व रेल्वे आधळला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
बिबटय़ाला काले येथून मोले येथे आणण्यात आल्यानंतर बेंडला येथील वनखात्याच्या वैद्यकीय पथकाकडून शवविच्छेदन करण्यात आले. यात बिबटय़ा गरोदर असल्याचे आढळून आले. बिबटय़ाच्या पोटात दोन पिल्लू होते. त्यानंतर वनखात्याच्या नियमानुसार मोले येथे अंतिम संस्कार करण्यात आले.









