प्रतिनिधी/ सातारा
महाविकास आघाडीमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. काँग्रेस पक्ष नाराज आहे. तो केंव्हाही या आघाडीतून बाजूला होवू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार हे कोसळणार आहे. त्यातील काही आमदार हे आमच्या संपर्कात आहेत. भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल. पुन्हा मुख्यमंत्री म्हणून राज्यात देवेंद्र फडणवीस हेच येतील, अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी साताऱयात केली. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे त्यामुळे मला पुन्हा गो कोरोना गो म्हणावे लागेल, अशी मिश्कील प्रतिक्रियाही आठवले यांनी यावेळी दिली.
सातारा दौऱयावर केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले हे आले असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सेना भाजप एकत्र येणे गरजेचे असतानाही ते आले नाहीत. त्यामुळे जे व्हायला नको ते झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार बनले गेले. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मान्य नसणारे सरकार बनलं. त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना नीटसे काम करता येत नाही. हे सरकार किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. आपल्याला विचारात घेतले जात नाही असा आरोप करत काँग्रेस पक्ष वारंवार नाराजी व्यक्त करत आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर हे सरकार कधीही कोसळेल. चांगलं राज्य चालवलं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही. निवडणुका लागाव्यात असे वाटत नाही. त्यामुळे भाजपाची सत्ता पुन्हा येईल. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच होतील. काही आमदार भाजपकडे येऊ शकतात. भाजपकडे 117 आमदार आहेत. त्यामुळे 27 आमदार आले की चित्र बदलू शकते, असाही दावा त्यांनी केला.
मास्क न वापरणाऱया नेत्यांवरही कारवाई व्हावी
लोकांवर जशी कारवाई होते तशी नेत्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. मास्क न वापरणे चुकीचे आहे. राज ठाकरे हे मनसेचे संस्थापक आहेत. ते एका पक्षाचे नेते आहेत. त्यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले पाहिजेत. पण कदाचित त्यांना उद्धव ठाकरेंचा आदेश पाळायचा नसेल. त्यांना स्वतःला चिंता नसेल पण त्याचा इतरांना त्रास होवू शकतो, अशी टिप्पणी केली. पुन्हा आपल्या महाराष्ट्रात कोरोना आला आहे. आपला महाराष्ट्र सुरुवातीपासून आघाडीवर राहिला आहे. आता 60 ते 70 टक्के केसेस या महाराष्ट्रामध्येच आहेत. 16 हजार केसेस भारतात आहेत. त्यातील दहा ते साडे दहा हजार केसेस या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाला थांबवणे आवश्यक आहे. सरकारने लग्न समारंभावर बंधने आणली पाहिजेत. 50 लोकांमध्येच लग्न झाले पाहिजे. पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. जास्त गर्दी टाळली पाहिजे, असे सांगितले. तसेच गो कोरोना गो मला पुन्हा म्हणावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
शेतकरी हिताचेच कायदे आहेत
दिल्ली येथे शेतकऱयांच्या नावाने सुरु असलेले आंदोलन थांबावे ही आमची भूमिका आहे. शेतकऱयांच्या हिताचे कायदे आहेत. कायदे सर्वांसाठी हितकारक आहे. त्यामुळे कायदा मागे हट्ट करणे चुकीचे आहे. त्याऐवजी दुरुस्ती करा अशी मागणी केली असती तर ठिक होते. लोकांना त्रास देणारे हे आंदोलन आहे. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आंदोलन थांबले पाहिजे होते पण आजही ते सुरुच आहे. प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला 5 एकर जमीन द्यावी यासाठी गायरान जमीन किंवा जिथे जमीन नसेल तिथे विकत घेऊन द्यावी अशी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी आहे. शेतकऱयांना कोणीही भूमिहिन करणार नाही. चुकीचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे शेतकऱयांनी आता आपली भूमिका बदलावी. राकेश टिकेत हे भडकावू भाषण करत आहे म्हणून आतापर्यंत आंदोलन टिकून आहे. सरकारच्या विरोधात जेवढी गरळ ओकायची तेवढी ओकू द्या. विरोधात बोलणाऱयाचे तेंड धरता येत नाही.
राहुल गांधी तर पाहिजे ते बोलत असतात त्याचा फायदा भाजपालाच होतो, अशीही टीप्पणी त्यांनी केली. तर उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर साडपलेल्या स्कार्पिओबाबत संशय आहे. यामध्ये वाझे यांची भूमिका संशयास्पद आहे, असेही मत आठवले यांनी व्यक्त केले.








