आमदारांच्या राजीनामासत्रामुळे डळमळीत झालेल्या पुदुच्चेरीच्या सत्तासिंहासनावरूनही अखेर काँग्रेसला पदच्युत व्हावे लागल्याने या पक्षाच्या हातातून आणखी एक राज्य (केंद्रशासित प्रदेश) निसटून गेले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडानंतर मध्य प्रदेशची सत्ता गमावल्यानंतर पुदुच्चेरीतूनही पायउतार होणे भाग पाडणे, हा काँग्रेससाठी मोठा झटका ठरतो. म्हणूनच एका छोटय़ा राज्यातील सत्ता गेली, अशा लघुदृष्टीने या सत्ताबदलाकडे काँगेससारख्या पक्षाने पाहू नये. 2014 पासून भाजपाचा अश्वमेध चौखूर दौडतो आहे. या काळात अनेक राज्ये भाजपाने पादाक्रांत केली असून, काही राज्ये पराभूत होऊनही अक्षरशः खेचून आणली आहेत. एकेकाळी काँग्रेसकडून जी आयुधे वापरली जायची, तीच किंबहुना त्यापेक्षाही प्रभावी व मायावी अस्त्रे अलीकडे भाजपाकडून वापरली जातात. मात्र, त्याचा सामना करण्यात आजची काँग्रेस कचखाऊ ठरताना दिसते. साम, दाम, दंड, भेद ही नीती राजकारणात नवी नाही. तथापि, आजचा भाजपा त्यापलीकडून जाऊन राजकारण करण्याइतका कठोर व पोलादी आहे. फोडाफोडी, हा या नव्या भाजपाचा प्रमुख अजेंडाच आहे. या फोडाफोडीतूनच राजकीय समीकरणे आपल्या बाजूने झुकविण्यात पक्ष बऱयाचदा यशस्वी होताना पहायला मिळतो. मध्य प्रदेश, पुदुच्चेरी ही अलीकडची ताजी उहादरणे. ज्योतिरादित्य शिंदे व अन्य बंडखोर आमदारांच्या साहय़ाने भाजपाने मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडून तेथे कशा प्रकारे सत्तांतर घडवून आणले, हे साऱया देशाने बघितले आहे. पुदुच्चेरीत आता तेच पहायला मिळते. 2016 साली काँग्रेसने 16 तर मित्रपक्ष डीएमकेने 4 जागा जिंकल्यानंतर नारायणसामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीचे सरकार येथे सत्तेवर आले. परंतु, हे सरकार अस्थिर कसे करता येईल, असेच प्रयत्न सतत विरोधकांकडून झालेले दिसतात. खरेतर या साऱयाला पुरून उरण्याचे कौशल्य नारायणसामी यांनी दाखवायला हवे होते. मात्र, त्यांच्यातील व नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यातील बेदिली, हेच काय ते या सत्ताकाळात उठून दिसले. दुसऱया बाजूला बेदी यांच्या उचलबांगडीमागेही काही रणनीती असणार, हे वेगळे सांगायला नको. या कारवाईनंतर चार दिवसात सरकार कोसळते, हेही बरेच काही सांगून जाते. आमदारांच्या राजीनाम्यामुळे सरकार अल्पमतात आल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी दिलेला राजीनामाही अपेक्षितच म्हणता येईल. आता सरकार स्थापण्याचा आपला कोणताही विचार नाही. मात्र, चर्चा सुरू असल्याचे विरोधी पक्ष नेते व एनआर काँग्रेसचे अध्यक्ष रंगास्वामी सांगतात. त्यांचा पक्ष, भाजपा व अण्णा द्रमुक यांच्या आमदारांची संख्या 14 वर पोहोचली आहे. मात्र, बहुमताकरिता 17 आमदारांची आवश्यकता आहे. आजतरी हे संख्याबळ कुणाकडे दिसत नाही. त्यामुळे येथे राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे मानले जाते. पुढच्या काही महिन्यात पुदुच्चेरी विधानसभेची निवडणूक होत आहे. ते पाहूनच काँग्रेस व डीएमके आमदारांनी कोलांटउडय़ा मारल्या असाव्यात. अगदी शेवटच्या क्षणी राहुल गांधी यांनी पक्षांतर रोखण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यात त्यांना यश आलेले दिसत नाही. राजकारण म्हटले, की यश व अपयश आलेच. मात्र, किमान मनापासून लढायला तरी हवे. येत्या निवडणुकीत तरी राहुल यांनी उपलब्ध सैन्यास सोबत घेऊन गांभीर्याने व सर्वशक्तिनिशी मैदानात उतरायला हवे. पंजाब, छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे तर महाराष्ट्रात हा पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीसोबत आहे. यातील राजस्थानमध्ये अधूनमधून कुरबुरी सुरू असतात. भाजपा आधीपासूनच संधीच्या शोधात आहे. त्यामुळे हा गड राखण्यासाठी काँग्रेसला डोळय़ात तेल घालून लक्ष द्यावे लागेल. इतिहासात जिंकणे हा काँग्रेसचा स्थायीभाव होता. आता सत्ताच्युत होणे, ही काँग्रेसची ओळख होऊ नये, इतकी दक्षता तरी पक्षधुरिणांनी घ्यायला पाहिजे. केंद्रात ज्या पक्षाची सत्ता असेल, त्या पक्षाचेच ढोल वाजविण्याकडे बव्हंशी लोकप्रतिनिधींचा कल असतो. त्यात ईडीने फास आवळल्यापासून भल्याभल्यांच्या निष्ठेला ग्रहण लागल्याचे दिसून येते. मोदी व शहा यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँगेसला लागलेली गळती, हे याचे उत्तम उदाहरण होय. तसा बंगालमध्ये भाजपाचा कालपरवापर्यंत अवकाश असा नव्हताच. पण, तो निर्माण करण्यासाठी भाजपाने केलेली फोडाफोडी अभूतपूर्वच होय. वास्तविक अतिरेकी पक्षप्रवेशावरून भाजपातही असंतोष आहे. मात्र, मोदी व शहा यांच्या पोलादी नेतृत्वापुढे बोलण्याची कुणाची टाप नसल्याने सगळय़ा गोष्टी रेटून नेल्या जात आहेत. जोवर यश आहे, तोवर हे असेच चालणार. गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश व काँग्रेसची पीछेहाट यातूनही काँग्रेसने बोध घ्यायला हवा. विधानसभेत जोरदार टक्कर दिल्यानंतर इतकी अवस्था दारूण का व्हावी, याचे पक्षाने आत्मचिंतन केले पाहिजे तर सुरतमध्ये ‘आप’ने केलेला शिरकाव, यातून भाजपापर्यंत योग्य संदेश जायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पंजाब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला तर अकाली दल, भाजपाला मोठा धक्का बसला. हाच काय तो काँग्रेससाठी दिलासा म्हणता येईल. आगामी काळात बंगाल, पुदुच्चेरीसह तामिळनाडू, केरळ, आसाममध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुका देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करतील. इंधन दरवाढीसारख्या विषयावरून सध्या सरकारविरोधात असंतोष आहे. खाद्यतेलांसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने महागाईच्या प्रचंड झळा सर्वसामान्यांना सहन कराव्या लागत आहेत. म्हणूनच पराभूत मानसिकता झटकून लोकांचे जीवनमरणाचे प्रश्न काँग्रेससारख्या पक्षाने हाती घ्यायला हवेत तर भाजपानेही केवळ पोपटपंची करण्यापेक्षा लोकांचे जीवन सुसहय़ होण्याकरिता जनहितकारक धोरणे राबविली पाहिजेत.
Previous Articleसर्वसाक्षी
Next Article बिशनसिंग बेदी यांच्यावर शस्त्रक्रिया
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








