104 वाहनांवर झाली होती कारवाई : पैकी सोळा वाहनांची कराची काही रक्कम भरल्याचे तपासणीत निष्पन्न
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
वाहन कर घोटाळय़ातील 104 वाहनांपैकी 16 वाहनांची कराची काही रक्कम भरल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या 16 वाहनधारकांना सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी पत्रे पाठविण्यात आली असून त्यांनी त्याची पूर्तता केल्यास ती वाहने नियमित होऊ शकतात, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत यांनी गुरुवारी येथे दिली.
दरम्यान उर्वरित 88 वाहनांबाबतही दंडात्मक कारवाई आणि न्यायालयाची परवानगी मिळाल्यास ती वाहने नियमित होऊ शकतात. त्या दृष्टीने वरि÷ स्तरावर हालचाली सुरू आहेत. मात्र ही वाहने नियमित झाल्याशिवाय रस्त्यावर चालवता येणार नाहीत. ती बंदच ठेवावी लागणार, अशी माहिती देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये 2017 ते 2020 या कालावधीत ‘बीएस-4’ च्या 104 वाहनांची नोंद झाली होती. मात्र या सर्व वाहनांबाबत कर फसवणूक करण्यात आली होती. पैकी 88 वाहनांचा वाहन कर भरला गेला नाही. तर 16 वाहनांचा वाहन कर भरण्यात आला. मात्र त्यांचे रजिस्ट्रेशन चुकीच्या पद्धतीने करण्यात आले होते. त्यामुळे सुमारे 90 लाख रुपयांचा घोळ करून शासन आणि संबंधित वाहन मालक यांची फसवणूक करण्यात आली होती. या बाबतची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तसेच या प्रकरणाची कार्यालयीन चौकशीही सुरू झाली होती.
या वाहन कर घोटाळय़ाची चौकशी रत्नागिरी जिल्हा उपप्रादेशिक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीमार्फत करण्यात आली. सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयात कार्यरत पाच कर्मचाऱयांचे लॉगिन आणि पासवर्ड या घोटाळय़ासाठी वापरण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या पाचही कर्मचाऱयांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. यात याच कार्यालयात कार्यरत सिद्धेश्वर भुले, स्वप्नील मोंडकर, श्रावणी मयेकर तसेच घोटाळय़ाच्या कालावधीत सिंधुदुर्गमध्ये कार्यरत असलेले आणि सध्या पेण येथे कार्यरत रामकृष्ण समदाळे आणि पनवेल येथे कार्यरत पद्माकर माने या पाचजणांचा समावेश आहे.
दरम्यान, या वाहन कर घोटाळय़ाची सखोल चौकशी करण्यात आली असता सोळा वाहनांचा कर भरला गेला आहे. मात्र रजिस्ट्रेशन चुकीचे झाले आहे, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या सर्व सोळा वाहनधारकांना पत्र पाठवून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे त्यांनी पूर्तता केल्यास ही सोळा वाहने नियमित होऊन त्या वाहनधारकांना दिलासा मिळू शकतो, अशी माहिती देण्यात आली.








