बेंगळूर/प्रतिनिधी
विधानपरिषदेचे सदस्य सी.पी. योगेश्वर यांना मंत्री बनण्यावरून पक्षात वाद सुरू आहे. या वादाला तोंड देत असताना मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी योगेश्वर यांना मंत्री करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी योगेश्वर यांना मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याचे निश्चित आहे.
यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचे राजकीय सचिव पी. एम. रेणुकाचार्य आणि आमदार राजू गौडा यांनी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सी. पी. योगेश्वर यांच्यावर आक्षेप घेतला होता. दुसरीकडे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी, सी. पी. योगेश्वर यांना मंत्री बनवण्यासाठी पक्षाच्या हाय कमांडवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
अलीकडेच भाजपचे आमदार राजू गौडा यांनी योगेश्वर यांना मंत्री करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला होता आणि ते म्हणाले होते की विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना मंत्री केले जाऊ शकतात तर मलिक्य गुट्टेदार आणि बाबूराव चिंचनसूर मंत्री का होऊ शकत नाहीत. यापूर्वी आम्ही निवडणूक हरलेल्या लक्ष्मण सावदी यांना उपमुख्यमंत्री केले आहे. तसेच ३-४ वेळा निवडणूक जिंकलेल्या आमदारांकडे दुर्लक्ष करून निवडणूक हरलेल्यांना मंत्री बनविणे योग्य नाही.
विशेष म्हणजे या सर्व वादाच्या संदर्भात मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सीपी योगेश्वर यांना मंत्री बनवण्याचे संकेत देऊन सर्वांना धक्का दिला आहे.









