निपाणी : येथील मुरगूड रोडवर विस्तारीत जागेचा गैरफायदा घेऊन फुटपाथवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. त्याची दखल घेऊन बुधवारी अशोका बिल्डकॉन कंपनीतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मुरगूड रोडवरील कृषी संपर्क कार्यालय ते श्रीनगरपर्यंत सुमारे 300 मीटरवरील दहा अतिक्रमणे हटविण्यात आली.
निपाणी-मुधोळ या 108 कि. मी.च्या राज्य महामार्गाचे काम तीन वर्षापूर्वी पूर्ण झाले. सदर महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी अशोका बिल्डकॉन कंपनीकडे 8 वर्षासाठी आहे. सदर महामार्गामुळे याठिकाणी वाहनांची वर्दळ वाढली आहे. अशातच महामार्गानजीकच्या विस्तीर्ण जागेवर काही व्यावसायिकांनी व्यवसाय थाटला. मात्र हळूहळू याठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण होऊ लागले. अनेकांनी पत्र्याची शेड उभारणी तसेच दुकानाचे फलक लावून अतिक्रमण केले. याठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने जात असतात. अशातच अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद बनत चालल्याने वाहनधारक व पादचाऱयांचा जीव धोक्यात आला होता. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी वारंवार होत होती.
त्यानुसार अशोका बिल्डकॉनचे मारुती कळके व विजय सावंत यांनी बुधवारी अतिक्रमण झालेल्या ठिकाणांची पाहणी करुन सदर अतिक्रमण हटविले. त्याचबरोबर पुन्हा अतिक्रमण केल्यास कडक कारवाईचा इशारा संबंधित व्यावसायिकांना देण्यात आला.









