प्रतिनिधी/ कराड
येथील नगरपालिकेतर्फे आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 26 सप्टेंबर ते ऑक्टोबर या सप्ताहात स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांत शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनींसह नागरिकांनी सहभाग घेतला.
सफाई मित्र सन्मान सोहळा
नगरपरिषदेमधील सफाई कर्मचारी, ड्रेनेज कर्मचारी, नाला सफाई कर्मचारी, कचरा संकलन कर्मचारी, कचरा प्रक्रिया कर्मचारी, मुकादम यांचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार समारोह घेण्यात आला. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांच्या हस्ते सन्मानपत्र तसेच गणवेश देऊन सन्मानित करण्यात आले.
कचर विलगीकरण अमृत दिवस
कचरा विलगीकरण अमृत दिवसानिमित्त शनिवार पेठ (पाटण कॉलनी), सोमवार पेठ (भैरोबा गल्ली, सुमंगलनगर, त्रिमूर्ती कॉलनी, नागोबा कॉर्नर, बुधवार पेठ (पंचशील चौक) या ठिकाणी कचरा विलगीकरण अमृत दिवस अंतर्गत पर्यावरण रक्षक व नगरपरिषद कर्मचारी यांच्यामार्फत सहा प्रकारे कचरा घंटागाडीत द्यायचा, याचे प्रात्यक्षिक नागरिक व महिलांना दाखवण्यात आले. ओला, सुका कचरा, कागद, प्लास्टिक, ई-कचरा, घातक कचरा या पद्धतीने वर्गीकरण करून तो घंटागाडीस द्यावा, याची माहिती देण्यात आली.
सार्वजनिक शौचालय सफाई
जन भागीदारी उत्सव अमृत दिवस अंतर्गत केंद्र सरकारने दिलेल्या स्वच्छ शौचालय ऍपवर सिटी पिटी केअर टेकर्स यांना ऍपबद्दल माहिती सांगून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये त्याचे फोटो व विडिओ काढण्यात आले.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास ऑनलाईन भेट
नगरपरिषदेमार्फत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन भेट कार्यक्रम राबवण्यात आला. घराघरातून संकलन केलेला कचरा प्रकल्पावर कसा येतो, कचऱयावर कशाप्रकारे प्रक्रिया होते, त्यापुढे त्या कचऱयाचे काय होते, याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. विविध शाळेतील विद्यार्थी, नागरिक व सामाजिक संस्थांनी यात सहभाग घेतला.
वेस्ट टु आर्ट प्रदर्शन
नगरपालिकेमार्फत वेस्ट टू आर्ट ऑनलाईन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वेस्ट प्लास्टिक, रिकाम्या बाटल्या अशा विविध वस्तूंपासून नाविन्यपूर्ण वस्तू कशा
प्रकारे बनविल्या जातात, याचे सादरीकरण करण्यात आले. यातही विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल बचत गटांचा सत्कार
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबाबत सामाजिक संस्था, बचत गट, गृहनिर्माण सोसायटी व नागरिकांचा ऑनलाईन पद्धतीने सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, गटनेते राजेंद्रसिंह यादव, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ख
प्रीतिसंगमावर स्वच्छता अभियान
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी कोल्हापूर नाक्यावरील पुतळय़ास अभिवादन करून स्वच्छता कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. सकाळी प्रीतिसंगमावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, मिलिंद शिंदे, प्रदीप भोकरे, वास्के, नदाफ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी स्वच्छता अभियानात सहभागी होते.









