भुवनेश्वरमध्ये आयोजन – भारतीय संघाची फ्रान्सविरुद्ध सलामी
भुवनेश्वर / वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱया वरिष्ठ स्तरावरील चमूकडून मार्गदर्शन मिळत असणारा कनिष्ठ भारतीय संघ देखील मायभूमीतच होणाऱया कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. यंदाची कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धा आजपासून (बुधवार दि. 24) खेळवली जाणार असून विद्यमान विजेत्या, यजमान भारताची सलामी लढत फ्रान्सविरुद्ध होईल.
भारताचा कनिष्ठ गटातील संघ जेतेपद कायम राखत 2021 च्या हंगामाची यशस्वी सांगता करण्यासाठी येथे विशेष प्रयत्नशील असणार आहे. येथे विजय संपादन केला तर भारतासाठी हे तिसरे जेतेपद असेल. भारताने 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाला चीत करत पहिल्यावहिल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली तर नंतर 2016 मध्ये लखनौत देखील जेतेपदाची पुनरावृत्ती केली.
ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा ही वरिष्ठ स्तरावर खेळण्यासाठी तयार होत असलेल्या युवा खेळाडूंची नवी फळी मानली जाते. यापूर्वी 2016 कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या संघातील 9 खेळाडू नंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळले, यावरुनही त्याची प्रचिती आली होती.
वरिष्ठ खेळाडू, प्रशिक्षकांचेही मार्गदर्शन
यंदाच्या विश्वचषकात विवेक सागर प्रसादच्या नेतृत्वाखालील अनेक युवा, आश्वासक खेळाडू आपली गुणवत्ता दाखवून देण्यासाठी प्रयत्नशील असतील. शिवाय, वरिष्ठ संघात संधी मिळवण्यासाठी आपली दावेदारी भक्कम करण्याच्या निर्धाराने ते मैदानात उतरतील. मनप्रीत सिंग, पीआर श्रीजेश, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड हे अनुभवी बीजे करिअप्पा यांच्या मार्गदर्शनाखालील कनिष्ठ भारतीय संघाला टीप्स देत आले आहेत.
अर्जुन पुरस्काराने सन्मानित विवेक सागर प्रसादने यापूर्वीच आंतराष्ट्रीय स्तरावर बरेच हॉकी खेळले असून ऑलिम्पिक कांस्यजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश राहिला आहे. विवेक सागरला स्टार ड्रगफ्लिकर संजयची येथे साथ लाभणार आहे. कनिष्ठ संघाला वरिष्ठ संघासमवेत सरावाची संधी मिळाल्याने याचा बराच लाभ होईल, असा विश्वास याप्रसंगी मुख्य प्रशिक्षक रीड यांनी व्यक्त केला.
‘विविध कारणांमुळे प्रदीर्घ कालावधीपासून जागतिक स्तरावर स्पर्धा झालेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर कनिष्ठ संघाचे भुवनेश्वरमध्ये वरिष्ठ संघाविरुद्ध काही सराव सामने आयोजित केले गेले. भुवनेश्वरमध्ये दाखल झाल्यापासूनच खेळाडूंना येथील स्टेडियमवर सरावाची संधी उपलब्ध करुन दिली गेली. याचाही त्यांना लाभ होऊ शकेल’, असे रीड म्हणाले. या स्पर्धेत सहभागी 16 संघ 4 गटातून विभागले गेले असून साखळी फेरीअखेर प्रत्येक गटातून दोन अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
गटनिहाय संघ
अ गट ः बेल्जियम, मलेशिया, चिली, द. आफ्रिका
ब गट ः भारत, फ्रान्स, कॅनडा, पोलंड.
क गट ः नेदरलँड्स, स्पेन, कोरिया, अमेरिका
ड गट ः जर्मनी, पाकिस्तान, इजिप्त, अर्जेन्टिना
स्पर्धेच्या इतिहासात जर्मनीचा संघ सर्वात यशस्वी
कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 5 देशांचे सातत्याने वर्चस्व राहिले असून यात जर्मनीचा संघ 6 जेतेपदांसह आघाडीवर आहे. त्यानंतर भारताने ही स्पर्धा 2 वेळा जिंकली आहे. अर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांनी प्रत्येकी एकदा जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. यंदा स्पर्धेतील सर्व सामने कलिंगा स्टेडियमवर प्रेक्षकांविना खेळवले जातील. फ्रान्सविरुद्ध लढतीनंतर भारताचा संघ कॅनडा व पोलंडविरुद्ध अनुक्रमे 25 व 27 नोव्हेंबर रोजी साखळी फेरीत लढणार आहे.









