अबु धाबी/ वृत्तसंस्था
अबु धाबी टी-10 लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात कर्णधार लिव्हिंगस्टोन, फिलीप सॉर्ल्ट आणि स्टर्लिंग यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर अबु धाबी संघाने चेन्नई ब्रेव्हजचा 8 गडय़ांनी पराभव केला. या स्पर्धेत अबु धाबी संघाचा हा सलग चौथा विजय आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई ब्रेव्हजने 10 षटकात 2 बाद 131 धावा जमविल्या. त्यानंतर अबु धाबी संघाने 9.2 षटकात 2 बाद 136 धावांसह विजय नोंदविला.
या सामन्यात चेन्नई ब्रेव्हज संघाच्या डावात लंकेच्या भानुका राजपक्षेने 54 धावा तर अँजेलो परेराने नाबाद 32 धावा झळकविल्या. अबु धाबी संघातर्फे कॉट्रेलने 16 धावात 1 गडी बाद केला. राजपक्षेने डावातील पहिल्या षटकात 2 षटकार खेचले. अबु धाबी संघाच्या डावात सलामीचा फलंदाज फिलीप सॉल्टने 5 षटकार आणि 5 चौकारासह 28 चेंडूत नाबाद 63 धावा जमवित आपल्या संघाला 4 चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला. सॉल्ट आणि स्टर्लिंग या सलामीच्या जोडीने 6.1 षटकात 88 धावांची भागीदारी केली. सॉल्टने मुनाफ पटेलच्या षटकात 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला. स्टर्लिंगने डावातील सहाव्या षटकात सलग 3 षटकार ठोकले.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई ब्रेव्हज ः 10 षटकात 2 बाद 131 (भानुका राजपक्षे 54, अँजेलो परेरा नाबाद 32, कॉट्रेल 1-16), अबु धाबी 9.2 षटकात 2 बाद 136 (सॉल्ट नाबाद 63, स्टर्लींग 44, मार्क देयाल 1-18).









