वार्ताहर / कणकवली:
कणकवली शहर व शहरालगत कलमठ भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील व्यापाऱयांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवण्याच्या आवाहनाला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जिल्हा व्यापारी संघटनेचे माजी कार्यवाह महेश नार्वेकर यांनी दिलेल्या माहितुनुसार कोरोनाचे
संक्रमण रोखण्यासाठी दुकाने बंदचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, गेल्या तीन महिन्यात व्यापाऱयांचे झालेले नुकसान लक्षात घेता शुक्रवारपासून नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत.
बाजारपेठेत अपवाद वगळता बहुतांश दुकाने बंद होती. तर काही दुकाने अंशत: सुरू ठेवण्यात आली होती. शहरात वरचीवाडी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातच कलमठ येथील पॉझिटिव्ह रुग्ण कणकवलीत काहींच्या संपर्कात आल्याचे व कनेडी येथील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात कणकवलीतील काही व्यक्ती संपर्कात आल्याचे समजताच शहरातील औषध दुकाने वगळून इतर सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याबाबत बुधवारी बैठकीत व्यापाऱयांनी तहसील कार्यालयात चर्चा केली. मात्र, त्यात एकमत होत नसल्याने व्यापाऱयांनी बुधवारी सायंकाळी उशिरा झालेल्या बैठकीत 30 जूनपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला होता.
गुरुवारी सकाळपासूनच बाजारपेठेत काही दुकाने अंशत: सुरू होती. तर तीन- चार दुकाने पूर्णत: सुरू ठेवण्यात आली होती. याबाबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विशाल कामत यांना विचारले असता, जी दुकाने सुरू आहेत, त्यांच्याशी चर्चा करून दुकाने बंद ठेवण्यासाठी आवाहन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सकाळच्या सत्रात पूर्ण बंद असलेली काही दुकाने दुपारी 12 नंतर सुरू करण्यात आली होती. त्यामुळे दुकाने बंदच्या मुद्यावरून व्यापाऱयांमध्ये अजूनही मतमतांतरे दिसून आले. एस. एम. हायस्कूलपासून काही दुकाने व स्टॉल अंशत: सुरू होते. दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत वर्दळ कमी होती. मात्र, काही दुकाने सुरू असल्याने आम्हीच दुकाने बंद का ठेवायची, असा सवाल काही व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात होता.









