वृत्तसंस्था/ लाहोर
ऑस्ट्रेलियाने येथे झालेल्या एकमेव टी-20 सामन्यात यजमान पाकचा 3 गडय़ांनी पराभव करत तब्बल 24 वर्षांनंतर आयोजित पाकिस्तान दौऱयाची विजयाने सांगता केली.
या एकमेव टी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकने 20 षटकात 8 बाद 162 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 19.1 षटकांत 7 बाद 163 धावा जमवित विजय नोंदविला.
या दौऱयामध्ये ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पाकने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. उभय संघात या दौऱयातील शेवटचा एकमेव टी-20 सामना खेळविण्यात आला आणि ऑस्ट्रेलियाने तो जिंकला.
पाकच्या डावामध्ये मोहम्मद रिझवानने 23 तर कर्णधार बाबर आझमने 46 चेंडूत 66 धावा झळकविल्या. बाबरने आपल्या खेळीमध्ये दोन षटकार आणि 6 चौकार ठोकले. 16 व्या षटकांत झम्पाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या इलिसने आपल्या शेवटच्या दोन षटकांमध्ये तीन गडी बाद केले. इलिसने 28 धावांत 4 गडी बाद केले. या सामन्यात फिंचने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली होती. ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार फिंचने 55 धावा झळकविल्या. हेडने 14 चेंडूत 26 धावा पटकाविल्या. इंग्लिसने 24 तर स्टोईनिसने 5 चौकारांसह 9 चेंडूत 23 धावा झळकविल्या. शेवटी मॅकडरमॉटने रॉफच्या गोलंदाजीवर विजयी चौकार नोंदवित ऑस्ट्रेलियाला 5 चेंडू बाकी ठेवून विजय मिळवून दिला. पाकतर्फे मोहम्मद वासीम, शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
पाक 20 षटकांत 8 बाद 162 (रिझवान 23, बाबर आझम 66, इलिस 4-28), ऑस्ट्रेलिया 19.1 षटकांत 7 बाद 163 (फिंच 55, इंग्लिस 23, हेड 24, मोहम्मद वासीम 2-30, शाहीन आफ्रिदी 2-21).









