क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
एफसी गोवाने यंदाच्या आयएसएल फुटबॉल मोसमात ऑस्ट्रेलियाचा डिफेंडर डायलन फॉक्स याला करारबद्ध केले आहे. मंगळवारी डायलनने एफसी गोवा क्लबशी करारासंदभांत सर्व सोपस्कार पूर्ण केले. गेल्या आयएसएल फुटबॉल मोसमात तो लीगमध्ये तिसरे स्थान मिळविलेल्या नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला खेळला होता. डायलनचा हा करार एक मोसमातपुरता असेल.
एफसी गोवाशी करार केल्यानंतर डायलन फॉक्सने आनंद व्यक्त केला. मोसम संपल्यानंतर लगेच एफसी गोवा व्यवस्थापनाने आपल्याशी संपर्क साधला होता. एफसी गोवा ज्या पद्धतीने आक्रमक खेळ करतात, त्या पद्धतीचा खेळ मला आवडतो आणि एफसी गोवाकडून मला ऑफर आल्यानंतर मी ती नाकारू शकलो नाही, असे फॉक्स म्हणाला.
गेल्या आयएसएलच्या मोसमात डायलन फॉक्सने नॉर्थईस्ट युनायटेडच्या मोहिमेत बचावफळीत जबरदस्त कामगिरी केली होती व संघाला तिसऱया स्थानावर नेले होते. त्याला प्रोफेशनल फुटबॉलचा चांगला अनुभव आहे. आमच्या बचावफळीत आम्हाला चांगल्या दमदार बचावपटूची आवश्यकता होती. डायलनच्या समावेशाने आता ती पूर्ण झाल्याचे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुष्कर म्हणाले. गेल्या मोसमात डायलन फॉक्स नॉर्थईस्ट युनायटेडसाठी 21 सामन्यांत खेळला. खलीद जमील यांच्या नॉर्थईस्ट युनायटेडला तिसरे स्थान मिळवून दिलेल्या डायलनच्या संघाला उपान्त्य फेरीत एटीके मोहन बागानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 27 वर्षीय फॉक्स ऑस्ट्रेलियाच्या ए-लीगमध्ये वॅलिंग्टन फिनिक्सला तीन तर सेंट्रल कोस्ट मरिनर्स संघाला एक मोसम खेळला आहे.









