बांगलादेशविरुद्ध 5 गडी राखून मात, बेथ मुनीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार
वेलिंग्टन / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन संघाने आयसीसी महिला क्रिकेट वनडे विश्वचषक स्पर्धेतील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशविरुद्ध निसटता विजय संपादन केला आणि गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली. बांगलादेशला निर्धारित 43 षटकात 6 बाद 135 अशा माफक धावसंख्येवर रोखल्यानंतर ऑस्ट्रेलियाला सातत्याने धक्के बसत राहिले आणि अंतिमतः 32.1 षटकात 5 गडय़ांच्या बदल्यात त्यांनी कसेबसे विजयाचे लक्ष्य गाठले.
या लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे 7 षटकांची कपात केली गेली. विजयासाठी 136 धावांचे किरकोळ आव्हान असताना ऑस्ट्रेलियाचे पहिले 3 फलंदाज 9.2 षटकात अवघ्या 26 धावात तंबूत परतले. मात्र, ताहिला (3) व गार्डनर (13) हे देखील स्वस्तात बाद झाले. बेथ मुनीची नाबाद 66 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. तिने 26 धावांवर नाबाद राहिलेल्या ऍनाबेलच्या साथीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. बेथला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.









