नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एका दिवसाच्या विश्रातीनंतर इंधन दरात शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी प्रतिलिटर 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. एकंदर चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.40 रुपयांची वाढ झाली आहे. शुक्रवारी सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरवाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 84 पैशांनी वाढले असून आता 112.51 रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलचे दर 85 पैसे प्रतिलिटरने वधारले असून ते 96.70 रुपयांवर पोहोचले आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 97.81 रुपये आणि डिझेलचा दर 89.07 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, 22 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत जे बदल करण्यात आले होते ते 137 दिवसांनी करण्यात आले होते. त्यापूर्वी देशात इंधन दर स्थिर होते. तज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग अनेक दिवस वाढू शकतात. दरम्यान, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर भडकल्यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचे वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी केले आहे.









