कोविन ऍपच्या धर्तीवर स्वतःच्या कुटुंबाची माहिती नोंदविता येणार ः डाटा संकलनाला होणार मदत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जनगणना 2021 साठी नागरिकांना स्वगणनेची (स्वतःचे नाव नोंद करणे) सुविधा देण्यात येणार आहे. सरकारने याकरता जनगणनेच्या नियमांमध्ये बदल केला आहे. परंतु ऑनलाईन जनगणनेसह आता देखील घरोघरी जात डाटा संकलन पेले जाणार आहे. केंद्र सरकारने मागील वर्षीच डिजिटल जनगणना करविण्याचा निर्णय घेतला होता.
जनगणना दुरुस्ती नियम 2022 नुसार ‘इलेक्ट्रॉनिक फॉर्म’चा अर्थ माहिती-तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 2 चे उपकलम (1) मध्ये नमूद व्याख्येनुसारच असणार आहे. याच्या अंतर्गत मीडिया, चुंबकीय, ऑप्टिकल, कॉम्प्युटर मेमरी, मायक्रो फिल्म किंवा अशाचप्रकारच्या उपकरणात पाठविलेली, प्राप्त किंवा संग्रहित कुठल्याही माहितीला इलेक्ट्रॉनिक स्वरुपाचीच मानण्यात येणार आहे.
नव्या नियमाच्या अंतर्गत अर्जदाराला जनगणना अर्ज भरण्याची अनुमती देण्यात येणार आहे. जनगणनेच्या अंतर्गत घरांची नोंदणी 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2020 होणे अपेक्षित होते. परंतु कोरोना संकटामुळे हे काम रोखण्यात आले होते. त्यानंतर सरकारने अद्याप नवे वेळापत्रक जारी केलेले नाही. सध्या जनगणना पोर्टलची इंटरनल टेस्टिंग करण्यात येत आहे. याच्या अंतर्गत 200 हून अधिक अधिकारी मोबाइलवर ओटीपीद्वारे डाटा भरून स्वगणनेचे परीक्षण करत आहेत.
जनगणना पोर्टल खुले झाल्यावर लोक स्वतःच्या मोबाइल क्रमांकाद्वारे लॉग इन करू शकतील. तेथे त्यांना लोकसंख्या गणनेसाठी सुमारे 258 प्रश्नांचा अर्ज भरावा लागेल. ऑनलाईन अर्ज भरल्यावर सर्वांना एक आयडी क्रमांक देण्यात येईल. होम लिस्टिंगसाठी अधिकारी घरी येतील, तेव्हा या आयडी क्रमांकाद्वारे डाटा सिंक होणार आहे.