लॉकडाऊनमध्ये ईपीएफओ ठरले तारणहार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांच्याकडून (ईपीएफओ) लॉकडाऊनच्या दरम्यान मागील दोन महिन्यात 36.02 लाख दावे निकालात काढण्यात आले असून 11,540 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती कामगार मंत्रालयाने दिली आहे. कोविडच्या संकटातून कर्मचाऱयांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी विविध प्रकारची योजना आखत ईपीएफओने सदरची रक्कम दिली आहे.
ईपीएफओकडून एकूण दाव्यापैकी 15.54 लाख दावे हे कोविड 19 च्या संकटात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत संबंधीत राहिले आहेत. यामध्ये 4,580 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. ईपीएफओमध्ये जे सदस्य 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन महिन्याला घेतात, त्यांना ईपीएफओमधून निधी काढण्यास मान्यता दिली आहे.
जवळपास 24 टक्के दावे हे ज्या लोकांचे वेतन 15 हजार ते 50 हजार रुपयांच्या आत आहे त्यांच्यासाठी तर 50 हजार ते त्यापेक्षा अधिक वेतन असणाऱया सदस्यांचे दावे फक्त दोन टक्के राहिले आहेत. हे काम लॉकडाऊनच्या दरम्यान ईपीएफओने आपल्या 50 टक्के कर्मचाऱयांच्या मदतीने केले असल्याची माहिती दिली आहे.









