वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पेटीएमने आपल्या पोस्टपेड सेवांचा विस्तार केला आहे. यामुळे पेटीएमच्या ग्राहकांना मोठय़ा प्रमाणात खरेदीची दारे उघडी होणार असल्याचे पहावयास मिळत आहे. यात जनरल स्टोर आणि रिलायन्स फ्रेश, हल्दीराम, अपोलो फार्मसी, शॉप्स स्टॅप सह अन्य रिटेल साखळीच्या माध्यमातून साहित्याची खरेदी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. यामध्ये तब्बल एक महिन्यांपर्यंत खरेदीची रक्कम जमा करण्यास सवलत मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
पेटीएम पोस्टपेड सेवेचा लाभ घेण्यासाठी पेटीएम ग्राहकांना फायनान्शिअल सर्व्हिसेस सेक्शनमध्ये पोस्टपेड आयकॉनवर जात ही सेवा घेता येणार आहे. हा पर्याय निवडत एनबीएफसीसोबत ऑनलाईन केवायसीची पूर्तता करावी लागणार आहे.
मागील वर्षात पोस्टपेडची सेवा पेटीएमने सुरु केली आहे. या कालावधीत अनेक ग्राहकांना पोस्टपेड सेवा दिली आहे. सुरुवातीला मोबाईल रिचार्ज, तिकिट बुकिंग व अन्य प्रकारची पेमेंट करण्याची सेवा दिली जात होती. परंतु यामध्ये आता बदलाचे संकेत लक्षात घेत कंपनीने पोस्टपेड सेवांचा विस्तार करण्यावर भर दिला आहे.
बिल भरण्याचा कालावधी
सदर ग्राहकांना पोस्टपेडची सेवा घेताना प्रत्येक महिन्याला दिनांक सातपर्यंत बिल जमा करणे बंधनकारक राहणार आहे. ही सेवा बिगर बँकिंग वित्तीय सेवा आणि सोबत पार्टनरशिपमध्ये सादर केली जात आहे.
कंपनीने पोस्टपेडला तीन प्रकारात सादर केले आहे. यामध्ये लाइट, डिलाईट आणि एलीट हे प्रकार आहेत. एकंदर विस्तार सेवा अधिक बळकट केली जाईल.









