वृत्तसंस्था/ माँटेव्हिडिओ
उरूग्वेचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू तसेच सर्वाधिक गोल नोंदविणारा लुईस सुवारेझला कोरोनाची बाधा झाली असल्याचे तो फिफाच्या आगामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्र फेरीचा ब्राझील विरूद्ध होणाऱया सामन्यात खेळू शकणार नाही, अशी माहिती उरूग्वेच्या फुटबॉल फेडरेशनने दिली आहे.
लुईस सुवारेझची कोरोना चांचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. सुवारेझला आता काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. ला लीगा स्पर्धेत तो ऍटलेटिको माद्रीद संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे पण ला लीगा स्पर्धेतील ऍटलेटिको माद्रीद आणि बार्सिलोना यांच्यात होणाऱया सामन्यात तो खेळू शकणार नाही. रविवारी उरूग्वे फुटबॉल संघातील सर्व फुटबॉलपटूंची कोरोनाची चांचणी घेण्यात आली. या चांचणीमध्ये सुवारेझ, रॉड्रिको मुनोझ आणि प्रशिक्षक वर्गातील सदस्य मतायस फेरल हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. उरूग्वेने फिफाच्या विश्वकरंडक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या सामन्यात कोलंबियाचा 3-0 असा पराभव केला होता. त्याचप्रमाणे 2001 पासून बलाढय़ ब्राझीलला उरूग्वेवर विजय मिळविता आलेला नाही. पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत दक्षिण अमेरिका गटातून ब्ा्राझीलने तीन सामन्यांतून 9 गुणांसह पहिले स्थान, अर्जेंटिना 7 गुणांसह दुसरे स्थान तर इक्वेडोर आणि उरूग्वे यांनी समान 6 गुण मिळविले आहेत.









