मनोहर सप्रे / देवरुख
शेती या क्षेत्राशी फारसा संबंध नसतानाही ताम्हानेतील युवक श्रीकांत तटकरे याने आपल्या जागेत एक एकर परिसरात चक्क इस्त्रायली पद्धतीने आंबा लागवड करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे यात आंतरपिक म्हणून अननस, भुईमूग व सर्व प्रकारच्या भाज्यांचीही उत्पादने त्याने घेतली आहेत. ही लागवड यशस्वी झाली असून पुढील वर्षापासून त्याचे उत्पादन सुरू होणार आहे. कोकणातील हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.

जवळपास २५ वर्षे मुंबईत मराठी रंगभूमीशी निगडित क्षेत्रात रमलेल्या श्रीकांत शिवराम तटकरे या युवकाने नाशिकमध्ये हा प्रयोग पाहिला. हा प्रयोग करणारे जनार्दन वाघेरे यांच्याकडून सर्व मार्गदर्शन घेत त्यांच्याकडचीच रोप घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हा प्रयोग राबवला आहे. २५ जून २०१९ मध्ये त्याच्या एक एकर जागेत तब्बल ८०० केसर व ५० विविध प्रकारच्या आंब्यांची लागवड करण्यात आली. याशिवाय ४५ वेगवेगळ्या प्रकारचे पेरू, ४५ विविध जातींचे काजू, ५० विविध प्रकारचे चिकु, विविध जातींची ३५ नारळ लागवडही करण्यात आली. याच्या जोडीला आंतरपिक म्हणून ३०० अननस लागवड झाली. याशिवाय टोमॅटो, वांगी, मिरची अशा भाज्या आणि बुश पद्धतीने काळीमिरीची लागवड इथे आहे.
पूर्णतः ठिबक सिंचन आणि सेंदीय खतावर ही लागवड असून येथे २०१९ पासून ६ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. स्वतः श्रीकांत आणि त्याचे वडील शिवराम हे दिवसभर शेतात असतात. पुढील वर्षी या कलमांना आंबे येणार आहेत. काही कलमांवर आता मोहोर असला तरी पूर्ण वाढ होईपर्यंत फळधारणा करण्यात येणार नाही, असे त्याने सांगितले. या प्रयोगासाठी स्थानिक कृषी सहाय्यक सुस्तरफोड यांचेही मार्गदर्शन सुरू असते. याच जोडीला त्याने अधिकृत नर्सरीची निर्मिती करून त्यात ८ हजार काजु आणि ५ हजार आंबा कलमांची निर्मिती केली आहे. याबाबत कुणालाही मोफ्ढत मार्गदर्शन किंवा लागवड करण्यास सहकार्य हवे असल्यास त्यांनी ९०८२४६८९६९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्याने केले आहे.
इस्त्रायली पद्धत म्हणजे काय?
इस्त्रायली पद्धतीत घन पद्धतीने आंबा लागवड करतात. कलमांची उंचावर वाढ होऊ दिली जात नाही. याच्या दोन ओळींमध्ये १० फुटांचे तर २ झाडात केवळ ३ फुटांचे अंतर असते. कलम जोर धरू लागले की, यात फाद्यांची छाटणी महत्त्वाची ठरते. गेल्या १९ महिन्यात या बागेत ७ वेळा छाटणी झाली असून यामुळे रोपं जागेवरच बहरली आहेत. याचा फायदा झाडांची उंची केवळ ५ ते ६ फुटच राहून त्याची निगा राखणे व फळ काढण्यासाठी उंचावर जाण्याची गरज लागत नाही. यात एका झाडाला एका वेळेला कमीत-कमी ६० तर जास्तीस्त-जास्त १५० आंबा मिळतो. इथे एका रांगेत ३ फुटांचे अंतर ठेवून ४५ कलमांची लागवड असून हा कोकणातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे.









