प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील माळनाका ते मारूती मंदिर दरम्यानच्या के. सी. जैन नगरलगत मुख्य रस्त्याशेजारील एका इमारतीच्या बांधकामाचा काही भाग मोठा आवाज करत अचानक कोसळल्याने परिसरातील साऱयांचा थरकाप उडाला. ही घटना घडताना तेथे कोणीही व्यक्ती नसल्यामुळे अनर्थ टळल्याने साऱयांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. शनिवारी दुपारी 2.30 च्या सुमारास ही घटना घडली.
के. सी. जैननगर लगतच मुख्य रस्त्याला लागून पूर्वीची पर्ल्स ग्रीन कंपनी कार्यालयाची जुनी इमारत आहे. ही वित्तीय कंपनी बंद होऊन बरीच वर्षे उलटली मात्र इमारतीच्या तळमजल्यात अनेक व्यापारी गाळे कार्यरत आहेत. या दुकानात व आजूबाजूलाही दरदिवशी सातत्याने मोठी वर्दळ असते.
शनिवारी दुपारी या इमारतीच्या जीर्ण झालेल्या बांधकामाचा मोठा तुकडा अचानक निसटून खाली पडला. सिमेंट प्लास्टरचा वजनदार तुकडा खालील दुकानासमोरील पत्रा शेडवर जोरदार आपटून पत्र्यातून आरपार होत खाली पडला. हा तुकडा पत्र्यावर पडताना झालेल्या मोठय़ा आवाजाने परिसरातील दुकानदार व आजूबाजूला वावरणाऱया मंडळींचा थरकाप झाला. साऱयांनीच आवाजाच्या दिशेने धाव घेतली. इमारतीचा खाली पडलेला भाग पाहून साऱयांनाच धस्स झाले. सुदैवाने त्यावेळी दुकानाच्या शेडखाली कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. पडलेल्या तुकडय़ाने शेडची नासधूस झाली आहे. मात्र अपघातग्रस्त इमारतीच्या टेरेसकडील कमानीचा भाग निसटून पडलेल्या तुकडय़ामुळे अधिक धोकादायक बनला आहे. त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा परिसरातून व्यक्त होत आहे.









