एससीव्हीटी परीक्षेचा पहिला पेपर गेला कठिण
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून व्यवस्थित शिकविणे झाले नाही. तरीही ऑनलाईन जो काही अभ्यास केला त्यावरच परीक्षा देण्याची वेळ शुक्रवारी आयटीआय विद्यार्थ्यांवर आली. परीक्षेची काठिण्य पातळी अधिक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नाकीनऊ आले. पेपर काहीसा कठिण गेल्यामुळे त्याची नाराजी विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर दिसून आली.
एससीव्हीटी अभ्यासक्रमाच्या आयटीआय कॉलेज विद्यार्थ्यांच्या द्वितीय वर्ष परीक्षेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. बेळगाव जिल्हय़ात केवळ एकाच केंद्रावर ही परीक्षा पार पडली. मजगाव येथे सरकारी आयटीआय कॉलेजमध्ये ही परीक्षा घेण्यात येत आहे. जिल्हाभरातून 500 हून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.
मागील दीड वर्षापासून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. बऱयाच विद्यार्थ्यांना कॉलेजपर्यंत पोहोचता आले नाही. आयटीआय हा टेड प्रात्यक्षिक शिकण्याचा आहे. अभ्यासक्रम व्यवस्थित झाला नसल्याने याचा परिणाम शुक्रवारी झालेल्या परीक्षेवर जाणवला. पहिलाच पेपर कठिण गेल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत होते.
परगावच्या विद्यार्थ्यांचे हाल
या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून आले होते. परीक्षा केंद्र शहरापासून दूर असल्याने परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या. नेसरगी येथील एक विद्यार्थी उशिराने परीक्षा केंद्रावर दाखल झाला. त्यामुळे या विद्यार्थ्याला परीक्षा केंदावर घेण्यात आले नाही. त्या विद्यार्थ्याने वारंवार विनंती केल्यानंतर त्याला परीक्षेला बसण्याची मुभा देण्यात आली.









