वाडा येथील महिलेस डिस्चार्ज : उर्वरित तिघांवर उपचार सुरू, प्रकृती स्थिर
- आणखी 81 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
- 148 जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात सापडलेल्या पाचव्या कोरोना बाधित देवगड तालुक्यातील वाडा येथील 51 वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल औषधोपचारानंतर फेरतपासणीमध्ये निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे गुरुवारी या महिलेस जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ात सापडलेल्या एकूण कोरोनो पॉझिटिव्ह आठ रुग्णांपैकी आतापर्यंत पाच रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत कोरोना बाधित तीन रुग्ण असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ातील देवगड तालुक्यातील वाडा येथील 21 वर्षीय युवती या सहाव्या व 23 वर्षीय युवती या सातव्या आणि नेरुर येथील 24 वर्षीय युवक या आठव्या कोरोना बाधित रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कात एकूण 51 व्यक्ती आल्या होत्या. पैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 11 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
आणखी 81 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
जिल्हय़ात एकूण 1 हजार 254 व्यक्ती अलगीकरणात आहेत. त्या पैकी 886 व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असून 368 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 228 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 80 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील आठ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 1 हजार 72 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 148 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 105 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 55 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, 37 रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये, 13 रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत गुरुवारी 5 हजार 206 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. जिल्हय़ात आढळलेल्या कोरोना बाधित आठ रुग्णांपैकी तीन रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून पाच रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्हय़ात 33 हजार 447 व्यक्ती दाखल
सिंधुदुर्ग जिल्हय़ात जिल्हय़ाबाहेरून मोठय़ा प्रमाणात व्यक्ती दाखल होत आहेत. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्ग जिल्हय़ात गुरुवारपर्यंत एकूण 33 हजार 447 व्यक्ती दाखल झाल्या.
घरीच अलगीकरण 0886
संस्थात्मक अलगीकरण 0368
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 1228
अहवाल प्राप्त झालेले नमुने 1080
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0008
निगेटिव्ह आलेले नमुने 1072
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0148
विलगीकरण कक्षात दाखल 0105
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0003
बुधवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 5206