कोरोना विषाणू या अदृश्य शत्रूने थैमान घातले असताना हे आव्हान स्वीकारण्यासाठी अनेक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. एरव्ही समाजाकडून दुर्लक्षिले गेलेले कारागृहातील कैदीही यात मागे नाहीत. आग्रा येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदी कोरोनाविरुद्ध सर्वाधिक उपयोगात आणले जाणारे शस्त्र म्हणजेच मास्क तयार करीत आहेत.

गेल्या मार्चमध्ये जेव्हा प्रथम देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हापासून या कारागृहातील कैद्यांनी मास्क बनविण्याचे मनावर घेतले. ही कल्पना एका कैद्याला सुचली. कारागृह प्रशासनाने ती उचलून धरली आणि मास्क बनविण्यासाठी लागणारी सामग्री सरकारच्या अनुमतीने खरेदी करून कैद्यांना पुरविली. मार्च 2020 ते मार्च 2021 या कालावधीत दोन लाख मास्क तयार करण्यात आले. मधल्या काळात कोरोना आटोक्मयात आला असे वाटत असतानाच आता पुन्हा त्याचा पूर्वीपेक्षाही अधिक प्रमाणात उदेक झाला आहे. त्यामुळे या कारागृहातील कैदी पुन्हा एकदा कोरोनाविरुद्ध लढण्यास सज्ज झाले आहेत. यंदा मास्कचे उत्पादन चार लाखांपर्यंत नेण्याचा त्यांचा विचार आहे. या कामात कारागृहातील साधारणतः दोनशे कैदी मग्न आहेत. हे मास्क सर्वसाधारणतः कारागृहाचा कर्मचारीवर्ग, इतर विभागांमधील सरकारी अधिकारी व आघाडीवरील कोरोना योद्धय़ांना पुरविण्यात येत आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांची बाजारात विक्री करण्याचीही कारागृह प्रशासनाची योजना असल्याचे सांगितले जात आहे.









