प्रतिनिधी/ बेळगाव
एकीकडे पर्यावरणादिनानिमित्त झाडे लावण्यात आली, तर दुसरीकडे फक्त इमारतीच्या दिखाव्यासाठी झाडे तोडण्यात आल्याचा प्रकार आंबेडकर रोडवर घडला आहे. कोणतीही परवानगी नसताना झाडांची कत्तल करण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने झाडे तोडण्यामागचे गौडबंगाल काय, असा मुद्दा पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.
येथील आंबेडकर रोडवर बसस्टॅण्डच्या बाजूने अनेक झाडे आहेत. या झाडांच्या सावलीमुळे अनेक प्रवाशांना आसरा मिळतो. येथील रस्त्याच्या बाजूने फूटपाथच्या शेजारी अनेक झाडे असल्याने पादचारी या झाडांच्या सावलीतून ये-जा करत असतात. मात्र जिल्हा रुग्णालय आवारात नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यात आल्याने उंच झाडांमुळे इमारत दृष्टीस पडण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे फक्त इमारतीच्या दिखाव्यासाठी येथील झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.
झाडे तोडल्याची माहिती मिळताच सुरेंद्र अनगोळकर, वरुण कारखानीस आणि अनिल अष्टेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विचारपूस करत लेखी परवानगी दाखविण्याची मागणी केली. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी सदर काम थांबविले. परवानगी असेल तरच झाडे तोडण्यास देऊ नाही तर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला.









