राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला न्यायालयाने फटकारले : मंगळवारी संपूर्ण कागदपत्रे दाखल करण्याची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्ताकाम बेकायदेशीररित्या सुरू करण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी अवमान याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याप्रकरणी बेळगाव येथील न्यायालयामध्ये अवमान याचिकेचा खटला सुरू करा, असा आदेश दिला आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांनी या न्यायालयामध्ये अवमान याचिकेचा खटला चालविता येणार नाही, असा युक्तिवाद केला. मात्र न्यायालयाने अवमान हा अवमानच असतो. त्यामुळे हा खटला उच्च न्यायालयाने चालविण्याची सूचना केली आहे. तेव्हा येथे हा खटला सुरू राहणार, असे सांगून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वकिलांना पाचवे दिवाणी न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला स्थगिती होती. मात्र स्थगिती असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासनाने दडपशाही करत या कामाला सुरुवात केली. त्यानंतर याप्रकरणी उच्च न्यायालयामध्ये शेतकऱ्यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्याठिकाणी पोलीस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांना नोटीस बजावली होती. तसेच बेळगाव येथील न्यायालयामध्ये हा खटला सुरू करा, असा आदेशदेखील दिला होता.
त्यानुसार या खटल्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. यावेळी प्राधिकरणाच्या वकिलांनी अपुरी कागदपत्रे त्याठिकाणी दाखल केली. हा खटला रद्द करावा, अशी मागणी त्यांनी त्याठिकाणी केली. मात्र न्यायालयाने हा खटला रद्द करता येणार नाही, तर या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. तेव्हा याबाबतची सर्व कागदपत्रे दाखल करावीत, अशी सूचना केली. पण कागदपत्रे नसल्यामुळे शेतकऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी आम्हीच सर्व कागदपत्रे या ठिकाणी दाखल करू, असे सांगितले. त्यावर मंगळवार दि. 24 रोजी सर्व कागदपत्रे दाखल करावीत, असे सांगितले. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चांगलेच अडचणीत आले आहे.









