‘कलिका हब्ब’उपक्रमाद्वारे उत्तम शैक्षणिक कामगिरीचा हेतू : लहानपणापासूनच मुलांच्या तर्कशक्तीत वाढ अभिप्रेत
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना काळात विद्यार्थी शाळेपासून दूर राहिले आणि अर्थातच अभ्यासाची त्यांची गोडी कमी झाली. या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा अभ्यासाची आवड रुजवून त्यांनी उत्तम शैक्षणिक कामगिरी करावी, या हेतूने राज्य सरकारने ‘कलिका हब्ब’ (अध्ययन उत्सव) हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यभरात गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस या अंतर्गत विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
कलिका हब्बअंतर्गत सरकारने एकूण 4 वेगवेगळे विभाग केले आहेत. त्यामध्ये ‘हाडू-आडू’ (गा-खेळा), ‘कागद-कत्तरी’ (कागद-कात्री), ‘माडू-आडू’ (कृती-खेळ) व ‘उर-सुत्तोणा’ (शहर-फिरूया) असे विभाग आहेत. हाडू-आडूअंतर्गत विद्यार्थ्यांना भाषा कौशल्य, विविध गाणी, कविता यांचे शिक्षण देऊन त्यांची रुची वाढविण्यात येणार आहे. कागद-कात्रीअंतर्गत अत्यंत कमी खर्चात विद्यार्थ्यांना कागदाच्या माध्यमातून विविध हस्तकला शिकवल्या जातील. यामध्ये प्रामुख्याने पेपर
बॅग तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
तिसऱ्या विभागात विविध वैज्ञानिक प्रयोग विद्यार्थ्यांनी करावयाचे आहेत. हे प्रयोग करताना त्यांची कारणमिमांसा जाणून घेतली पाहिजे, विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजेत आणि शिक्षकांनी त्यांची उत्तरे देणेही अपेक्षित आहे. चौथ्या विभागात विद्यार्थी शहराचा फेरफटका मारतील. आपल्या शहराची किंवा परिसराची वैशिष्ट्यो जाणून घेतील. यामध्ये एखाद्या झाडाचा इतिहाससुद्धा विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावा. म्हणजेच निरीक्षण आणि अभ्यास यावर भर द्यावा, अशी अपेक्षा आहे. शिवाय एखाद्या व्यक्तीची मुलाखतही घ्यावी. पोलीस स्टेशन व अन्य कार्यालयांना भेट देणेही अभिप्रेत आहे.
तर्कशक्तीत वाढ
कलिका हब्बमुळे मुलांची तर्कशक्ती वाढते. त्यांच्यातूनच एखादा कवी, लेखक तयार होईल. एखादा कार्यकर्तासुद्धा निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे. याच हेतूने राज्यभरात गुरुवारी शालेय विद्यार्थ्यांनी विविध रंगीबेरंगी पोषाख करून आणि वेगवेगळी रंगभूषा करून प्रचारफेरी काढली. यामध्ये संत बसवेश्वर, कित्तूर राणी चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा, छत्रपती शिवराय आणि भारतमाता यांची वेषभूषा विशेष आकर्षण ठरली. मुकुट परिधान केलेले शिक्षक, वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी, त्यांना वाद्यांची साथ यामुळे ही फेरी लक्षवेधी ठरली.









