महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
सहस्रबाहूंचें तुळीं बळ । परजी लहुडी भुशुंडी शूळ ।
पाश पट्टिश चपें त्रिशूळ । भिंदिपाळपरिघादि ।
तोमर मुद्गर कुंत मुसळ । वज्र कृपाण खेटक हळ ।
गदापरश्वधविद्याकुशळ । शक्ति विशाळ पडताळी ।
धनुर्वेदाचीं आवर्तनें । अस्त्रप्रयोग बीजपठनें बीजपठनें । परशस्त्रांचीं निवारणें । उपसंहरणें दिव्यास्त्रां । हें देखोनि प्रधान आप्त । पुसती कोण हा विचार गुप्त । कैसेनि आनंद झाला प्राप्त । कीजे क्लृप्त तो आम्हां । ऐसें ऐकूनि म्हणे बाण । म्यां प्रार्थिला गौरीरमण । मजसी करी समराङ्गण । तो योद्धा दारुण याचिला । संतुष्ट होवोनिया शङ्कर । कामिलाऐसा दिधला वर । केतु भंगेल तैं तुज वीर। समरिं दुर्धर जोडेल । ऐकोनि प्रधान मंत्री म्हणती। उदेली दुर्दैवें दुर्मति । अमृत हाणोनि लत्ताघातीं । धरिली प्रीति विषपानीं । अपयश गर्भा आलें असे। म्हणोनि डोहळे झाले ऐसे । पाव कवळावया संतोषें। पतंग जैसे सोत्साह । आपुल्या वीर्याचें नाशन । कर्ता जुंझार रुद्रासमान । केव्हां मजशीं करील रण । तें शिववरदान प्रतीक्षी । शिवाकडून इच्छित वरदान प्राप्त करून घेऊन बाणासुर अत्यंत आनंदात आपल्या महालात परतला. त्याने वेगवेगळय़ा शस्त्रांचा सराव उत्साहात सुरू केला. धनुर्वेदातील मंत्रांचे आवर्तन तो करू लागला. त्याचा हा उत्साह पाहून प्रधानाने प्रश्न केला – महाराज! आपणाला काही विशेष आनंद झालेला दिसतो. आपला उत्साह शतगुणीत झालेला आहे. त्यावर बाणासुराने आपल्याला शिवाकडून वरदान मिळाले असून शिवासमान पराक्रमी व बलवान योद्ध्याशी लवकरच सामना करावयाला मिळेल, त्यामुळे आपल्याला आनंद झाल्याचे सांगितले. त्याचे म्हणणे ऐकून प्रधान मनोमन म्हणाला – या बाणासुराचे दुर्दैव पहा. अमृताला लाथ मारून याने विषाला जवळ केले आहे. आपला नाश आपणच ओढवून घेतला आहे. याचे अपयश याच्या पोटीच आता जन्म घेईल. पतंगाप्रमाणे याने स्वतःच दिव्यावर झेप घेतली आहे. असो इतुकी बाणकथा। ध्वजभंगाचा हेतु कोणता । तोही पुससि जरी कुरुनाथा । तरी तत्त्वता निरूपितों। उषानामका दुहिता त्याची । अनुपनीतां असतां साची । स्वप्नामाजी अनिरुद्धाची। रति लाभली दैवबळें । कन्याशब्दें अपर्णिता । सुरतक्रीडेची अनभिज्ञता ।
जो नर देखिला ऐकिला नसतां । तेणें तत्त्वता रति केली । कान्त म्हणिजे अतिसुन्दर । नवयौवनें निमासुर। तेणें स्वप्नीं सुरताचार । केला असुरतनयेशीं । कोण्या साधनें कैसें दैव । कैसा स्वप्नप्रादुर्भाव। केंवि लाभली नर अपूर्व । तेंही सर्व अवधारा । तें येथ श्रीमद्भागवतीं । वदला श्रीशुक संकळितीं। यालागीं विष्णुपुराणसंमति । कथान्वय निगुती कथिजेतों । कथासंबंध उमजावयासी । वैष्णवोक्त इतिहासासे । संदर्भितां अनारिसी । टीका विदुषीं न मनावी । बाणासुराची तनया उषा । जिचिया लावण्यरसपीयूषा । सुरनरामलोचनां तृषा।चकोरां निशारमणवत् । लावण्यरसाची पुतळी। नवयौवनें कोमळ वाली । दिव्याभरणेंसी विल्हाळी ।रूपनव्हाळी देखतयां । Ad. देवदत्त परुळेकर








