आज कोजागरी पौर्णिमा! घरोघरी रात्री दूध आटवून तिचा चंद्राला नैवेद्य दाखवला जातो. चंद्रप्रकाशात हे दूध काही तास ठेवल्यास त्यात औषधी गुणधर्म वाढतात. या दिवशी लक्ष्मीचे व्रत केले जाते. घरोघरी जाऊन देवी लक्ष्मी विचारते, ‘को जागरति’ म्हणजे कोणी जागे आहे का? लक्ष्मी म्हणजे समृद्धी! मग तिला का बरे विन्मुख करायचे? वेदकाळामध्ये चंद्रावर सूक्तही लिहिलेली आढळतात. चंद्राला देवानीदेखील वेगवेगळय़ा कारणासाठी आपल्या अक्षरश: डोक्मयावर बसवले आहे. त्यासंबंधीचा एक श्लोकही प्रसिद्ध आहे. दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णवसंभवम्। नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम्।।अर्थ-दही, शंख, तुषार यांच्याप्रमाणे शोभून दिसणाऱया, समुद्रातून निर्माण झालेल्या, भगवान शंकरांच्या डोक्मयावरील मुकुटाप्रमाणे शोभून दिसणाऱया चंद्राला मी नमस्कार करतो. शरद ऋतूतील चंद्र हा आकाराने मोठा दिसतो. तसेच त्याचे सौंदर्य या काळात अधिकच खुलून येते. असे म्हणतात की, ताजमहालाचे सौंदर्यही कोजागरीच्या दिवशी अपूर्व असते. चंद्राला संस्कृतमध्ये इंदू, कुमुदबांधव, चंद्रमा, निशाकर, मृगांक, रजनीनाथ, शशांक, सुधांशु, सोम अशी कितीतरी नावे आहेत. आकाशात रोहिणी नक्षत्राचा तारा चंद्राच्या जवळ येतो, म्हणून रोहिणीला चंद्राची पत्नी मानले जाते. पृथ्वीवरून जो चंद्राचा भाग प्रकाशित दिसतो, त्याला चंद्राची कला म्हणतात. शुक्ल प्रतिपदेपासून चंद्र कलेकलेने वाढतो व पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार होऊन पुन्हा कृष्णपक्षात कलेकलेने लहान होतो. अमावास्येला त्याची अप्रकाशित बाजू आपल्याकडे असते. म्हणून तो दिसत नाही. चंद्रावरील डाग म्हणजे मोठमोठी विवरे आहेत. हे अगदी भारतासकट विविध देशांनी चंद्रावर याने पाठवून सिद्ध केले आहे. तिथे वातावरण नाही, कोणताही जीव नाही इ. अनेक गोष्टी विज्ञानामुळे आपल्याला कळल्या आहेत. तरी चंद्राबद्दलचे आपले प्रेम कमी झालेले नाही. त्याची शीतलता, सौम्य प्रकाश, सौंदर्य सर्वांच्याच मनाला भुरळ घालते. चंद्रप्रकाशाला चांदणे किंवा कौमुदी म्हणतात. पौर्णिमेला सागरालाही उधाण येते. मोठमोठय़ा लाटा उसळतात. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने व गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव वाढल्याने असे होते असे एक खगोलीय कारण आहे. या चंद्राच्या शीतलतेचा गुण सांगणारे ही एक सुभाषित आहे. चन्दनं शीतलं लोके चंदनादपि चंद्रमा। चंद्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगति:।। अर्थ:-जगात चंदन शीतल आहे, चंदनापेक्षाही चंद्र शीतल आहे, चंदन व चंद्रापेक्षाही सज्जन लोकांचा सहवास अधिक शीतल आहे. या शीतलता देणाऱया तीनही गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. पण आपल्याला नेहमी सहजपणे मिळणारी शीतलता चंद्राकडून कायमच मिळते, नाही का? आज या कोजागरीच्या दिवशी आनंदाच्या चांदण्यात न्हाऊया!
Previous Articleअमृत हाणोनि लत्ताघातीं
Next Article उत्तराखंडात 305 नवे कोरोना रुग्ण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








