जाम्बवंत हा आपला भक्त आहे हे जाणून भगवान श्रीकृष्ण त्याचा केवळ गर्व परिहार करू इच्छितो. दैत्यावर ज्याप्रमाणे क्रोधाने भगवान प्रहार करून त्याला मारतात तसा प्राणघातक प्रहार त्यांनी जांबवंतावर केला नाही.
एवं अट्ठावीस अहोरात्र । युद्ध केलें घोर विचित्र ।
विद्युत्पातासम कठोर । मुष्टिप्रहार परस्परें ।
जैसीं विंध्याद्रीचीं शिखरें । इंद्र भंगी वज्रप्रहारें ।
तैसीं उभयतांचीं गात्रें । भंगतीं निकरें मुष्टितळीं ।
अट्ठावीस अहोराती । न लावितां नेत्रपातीं ।
युद्ध केलें ऐसिये स्थिती । अविश्रमगती परस्परें ।
तया युद्धचा फलितार्थ । जय पराजय कोणा प्राप्त ।
तोहि ऐका देऊनि चित्त । मूळश्लोकोक्त संक्षेपें ।
याप्रमाणे अठ्ठाविस रात्रंदिवस जांबवंत व श्रीकृष्ण यांच्यातील तुंबळ द्वंद्वयुद्ध चालले. आकाशात विजा एकमेकावर आपटाव्यात त्याप्रमाणे ते एकमेकावर कठोर मुष्टीप्रहार करत होते. विंध्याद्री पर्वताची शिखरे ज्याप्रमाणे इंद्राने वज्रप्रहाराने फोडली, त्याप्रमाणे आपल्या मुष्टिप्रहाराने त्यांनी एकमेकाची गात्रे फोडली. डोळय़ाच्या पापण्याही न लवू देता, अविश्रांतपणे त्यांनी अठ्ठावीस दिवसरात्र पर्यंत द्वंद्वयुद्ध केले. त्या युद्धात कोण जिंकले व कोण पराभूत झाले हे आता लक्षपूर्वक ऐका असे महामुनी शुकदेव सांगतात.
कृष्णमुष्टीचे नि÷gर प्रहार । वज्राहूनि अतिकठोर ।
लागतां ऋक्षाचें सर्व शरीर । झालें चकचूर निष्पष्टि ।
ऊरुबंधनें प्रौढसंधि । बाहू कूर्परादि मणिबंधीं ।
कळा लागल्या बंधोबंधीं । जानुजघनीं गुल्फादिकें ।
ढिले झाले सर्व सांदे । उतरोनि गेलें आढ्यत्वमांदें ।
सर्वाङ्ग व्यापिलें प्रबळ तोंदें । आस्वल मोदें सांडवलेरं।
दु:खें धैर्या झाला भंग । स्वेदें डबडबिलें सर्वाङ्ग ।
सुटला मदगर्वाचा संग । मग श्रीरंग ओळखिला ।
जाम्बवताचे मुष्टिप्रहार । कृष्णाआंगीं लागतां क्रूर ।
त्याणें त्याचेच भंगले कर । अभंग श्रीधर सर्वात्मा ।
जितुकें जळ वर्षें सागरिं । तो तें आत्मत्वें स्वीकारी ।
कीं घट मठ पर्वत पृथ्वीवरी । अभेदें धरित्री जड न मनी ।
इन्धनीं आच्छादितां वैश्वानर । इन्धनेंचि होय प्रचुरतर ।
तेंवि श्रीधर जगदाधार । शक्ति समग्र चेतविता ।
जाम्बवंताचें जितुकें बळ । कृष्णाआंगींचेंचि तें केवळ ।
तेणें कृष्ण होय विकळ । हें बोलणें वोफळ मूर्खाचें ।
घटाकाशें गिळिजे मठ । कीं मठाकाशा ब्रह्माण्डघोंट ।
न करवे तेंवि वैकुंठपीठ । न पवे कष्ट ऋक्षबळें ।
श्रीकृष्णाच्या मुष्टिप्रहारिं । परम वैकल्य ऋक्षशरीरिं ।
विस्मय पावोनि अंतरिं । विचार विवरी हृदयांत ।
श्रीकृष्णाच्या वज्राहून कठोर मुष्टीप्रहारांनी जांबवंताचे सर्व शरीर चकणाचूर झाले. त्याचे सर्व सांधे ढिले झाले. सर्व सांध्यातून असह्य कळा येऊ लागल्या. त्या महाबलाढय़ अस्वलाचा सगळा गर्व उतरला. दुखण्याने धैर्याचा भंग झाला. त्याचे सारे शरीर घामाने डबडबले. आता त्याचा मद, गर्व त्याला सोडून गेला. मग त्याने श्रीरंगाला ओळखले. जाम्बवंताचे मुष्टीप्रहार श्रीकृष्णाच्या शरीरावर क्रूरपणे पडत होते. पण त्याने श्रीकृष्णाला कोणतीच इजा किंवा दुखणे न होता उलट जांबवंताचे हातच त्यामुळे भंगले, कारण श्रीधर सर्वात्मा तर अभंग आहे.
Ad. देवदत्त परुळेकर








