आजपासून वाहतूक पोलिसांचे कडक धोरण
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील वाढत्या अपघातांची मालिका चालुच आहे. वाहतूक पोलीस विभागाने त्याची गंभीर दाखल घेतली आहे. आजपासून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात येतील व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.
वाहतूक पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना स्पष्ट केले की, राज्यात दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. दररोज माणसांचे बळी जातात. वाहनचालक अतिवेगाने वाहने हाकत असल्याचे लक्षात आले आहे. नववर्षाच्या निमित्ताने अनेक पर्यटक गोव्यात आले आहेत. त्यामुळे कोणालाही त्रास द्यायचा नाही, असे धोरण होते, आता उत्सव संपले, आज दि. 2 जानेवारीपासून राज्यात बेफाम वाहने हाकणाऱयांविरुद्ध तसेच हेल्मेट परिधान करीत नाहीत अशा वाहनचालकांना दंड ठोठावला जाईल. वारंवार सांगून देखील चालक ऐकत नसल्याने आता कडक कारवाई केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.
आणखी पाच इंटरसेप्टर मागविले
गावस यांनी सांगितले की, सध्या वाहतूक पोलीस विभागात चार इंटरसेप्टर्स आहेत. आणखी पाच इंटरसेप्टर्स मागविले आहेत. अपघात प्रवण क्षेत्रात आसपासच्या परिसरात इंटरसेप्टर लावून वाहनांची वेगमर्यादा तपासल्या जातील व नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. येत्या 15 जानेवारीपासून राज्यात नवा मोटरवाहन कायद्याची अंमलबजावणी होणार आहे, त्यानंतर कारवाई तीव्र होईल. जो काही दंड सुचविला आहे तो भरणेही कठीण होऊन जाईल. वाहनचालकांमध्ये त्यातून शिस्त वाढणार, असा विश्वास अधीक्षक अरविंद गावस यांनी व्यक्त केला.









