प्रतिनिधी/ फोंडा
दुधसागर सहलीहून परतणाऱया पर्यटकाच्या कारगाडीला दयानंदनगर धारबांदोडा येथे झालेल्या स्वयंअपघातात कारचालक ठार झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. निखिल प्रकाश (34, मूळ बिहार) असे मृत युवकाचे नाव आहे. अपघात शुक्रवारी सायंकाळी 4.30 वा. सुमारास संजीवनी साखर कारखान्याजवळ घडला. सोनू कुमार (30) व पंकज गौर (33) अशी दोन्ही जखमींची नावे आहेत.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिघे मित्र सकाळी भाडय़ाची होंडा सिटी जीए 07 सी 1211 या कारगाडीने कुळे येथील दुधसागर येथे सहलीला गेले होते. सायंकाळी सहलीतून परतीच्या वाटेवर कुळेमार्गे फेंडय़ाला येत असताना धारबांदोडा येथे संजीवनी साखर कारखान्याजवळ चालकाचा गाडीवरील ताबा गेला, कारगाडीची सरळ धडक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दिली. कारगाडीचा दर्शनी भाग चक्काचूर झाला असून त्यात चालकासह अन्य दोघेजणांना अत्यावस्थ अवस्थेत बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले. कारचालक निखिल प्रकाश याला तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी उपनिरीक्षक सुरज काणकोणकर अधिक तपास करीत आहे.









