ग्राम पंचायतीचा अध्यक्ष कोण? याची चर्चा जोरात
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर आता अध्यक्षपदाच्या आरक्षणाकडेच साऱयांचे लक्ष लागले आहे. काही जण आपणाला अध्यक्षपद मिळावे म्हणून आरक्षणाची मोर्चेबांधणी करत असल्याचे दिसून येत आहे. जिह्यातील आरक्षणाची आकडेवारी जाहीर झाली आहे. मात्र, कोणत्या ग्राम पंचायतीला कोणते आरक्षण द्यायचे हे जिल्हाधिकाऱयांवर अवलंबून आहे. त्यामुळे अनेक जणांनी आता आपले राजकीय वजन वापरण्यास सुरुवात केली आहे.
ग्राम पंचायत निवडणूक मोठय़ा चुरशीने पार पडली होती. या निवडणुकीलाही मोठय़ा प्रमाणात खर्च झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही जणांनी चक्क 5 ते 10 लाखापर्यंत खर्च केला असून आता हा खर्च काढायचा कसा? अशा विवंचनेत अनेक जण अडकले आहेत. ग्राम पंचायत सदस्यपद मिळाले तरी अनेक ग्राम पंचायतींमध्ये दोन-तीन गट आहेत. त्यामुळे पैसे खर्च केलेले अनेक जण हा पैसा काढण्यासाठी व्युहरचना करताना दिसत आहेत. जिह्यातील आरक्षणाची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे आतापासून अनेक जण लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहेत. कोणत्या ठिकाणी सामान्य, कोणत्या ठिकाणी पुरुष तर कोणत्या ठिकाणी अनुसूचित जातीचा अध्यक्ष पाहिजे याची चर्चा करून आम्हाला त्याच प्रकारे आरक्षण हवे आहे, असे ते आपल्या नेत्यांना गळ घालताना दिसत आहेत. एकूणच अध्यक्षपदाच्या निवडीमध्येही पैशांचा घोडेबाजार चालण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. काही जणांनी आताच काही ग्राम पंचायत सदस्यांना पैशाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने घेतल्याची चर्चाही सुरू आहे. येत्या काही दिवसांत आरक्षण जाहीर झाल्यानंतरच आता अध्यक्षांची माळ कुणाच्या गळय़ात पडणार हे समजणार आहे.









