वृत्तसंस्था/ डोहा (कतार)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या कतार खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारूसची माजी टॉप सीडेड व्हिक्टोरिया अझारेंका त्याचप्रमाणे अमेरिकेची ऍनिसिमोव्हा आणि फ्रान्सची कॉर्नेट यांनी विजयी सलामी दिली.
पहिल्या फेरीतील सामन्यात अझारेंकाने कझाकस्तानाच्या पुतिनसेव्हाचा 5-7, 6-2, 7-5 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. अझारेंकाने 2012 आणि 2013 साली कतार खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. अझारेंकाला सलामीच्या सामन्यात पुतिनसेव्हाने तब्बल तीन तास झुंजविले. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या ऍनिसिमोव्हाने ब्राझीलच्या मेयाचा 7-5, 6-4, फ्रान्सच्या कॉर्नेटने रशियाच्या सॅमसोनोव्हाचा 3-6, 6-4, 7-5, अमेरिकेच्या मॅडिसन ब्रेंगलने तुर्कीच्या इपेक ओझचा 7-5, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.









