अगदी शवागरातही करावी लागतेय जागेसाठी प्रतीक्षा : ‘कोरोना दाहकते’च्या झळा सिंधुदुर्गलाही
21 दिवसांत जिल्हय़ात तब्बल 48 मृत्यू
प्रतिदिन मृत्यूचा आकडा पोहोचला सहावर
प्रतिदिन पाचच मृतदेहांवर अंत्यसंस्कार शक्य
एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी तीन तास
शवागरात सहा मृतदेहांसाठीच आहे व्यवस्था
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:l
कोरोनामुळे झालेला मृत्यू त्या व्यक्तीसाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी किती वेदनादायी ठरतोय, हे गेल्या वर्षभरापासून पूर्ण विश्व अनुभवतेय. आपल्या जिल्हय़ात कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण तुलनेत कमी होते. त्यामुळे त्याची दाहकता काहीशी कमी होती. मात्र या एप्रिलच्या सुरुवातीपासून कोरोनाने जिल्हय़ाला घातलेला विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होत असल्याने स्थिती खूपच दाहक होत चालली आहे. एवढी की कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी ‘वेटिंग’वर राहावे लागत आहे. हे झाले अंत्यसंस्काराचे. त्याहूनही गंभीर म्हणजे अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेसाठी हे मृतदेह ठेवण्यास शवागरामध्येही जागा नसल्याने तेथे ते ठेवण्यासाठीही ‘वेटिंग’ करावे लागत आहे.
गत 21 दिवसांत जिल्हय़ात तब्बल 48 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 3500 व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांमध्ये तर दररोज पाच ते सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास दोन-दोन दिवस थांबावे लागत आहे.
मृत्यूपश्चात परवड
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधीकरण मार्फत व्यवस्था केली आहे. प्राधीकरणमधील स्मशानभूमीमध्ये या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात मृत्यूसंख्या कमी असल्याने अंत्यसंस्कार करताना फारशी अडचण आली नव्हती. काही मृतदेहांवर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सद्यस्थितीत मृतांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मृतदेह शवागृहामध्ये ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ‘वेटिंग’ करावे लागत आहे.
आणखी एक स्मशानशेड आवश्यक
प्राधीकरणमध्ये यापूर्वीच एक स्मशानशेड उभारण्यात आली होती. परंतु, ही स्मशानशेड लोकवस्तीला लागून असल्याने ती बंद करून दुसऱया जागेत उभारण्यात आली. सद्यस्थितीत एकमेव स्मशानशेड त्या ठिकाणी आहे. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत किमान तीन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे दिवसभरात चार ते पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. आता ही संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी दुसऱया दिवसापर्यंत थांबावे लागत आहे. दोन स्मशानशेड उपलब्ध झाल्या असत्या, तर ही वेळ आली नसती. तसेच गेल्या वर्षभरापासून सिंधुदुर्गनगरी प्राधीकरण क्षेत्रामध्ये अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनीची मागणी होत आहे. खासदार विनायक राऊत यांनी विद्युत दाहिनीसाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा, असे पत्रही दिले होते. मात्र जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली अजून तरी झालेल्या नाहीत.
शवागरामध्येही करावी लागतेय प्रतीक्षा
जिल्हा रुग्णालयाच्या शवागरामध्ये सहा मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे सहापेक्षा जास्त मृत्यू झाल्यावर शवागरामध्येही मृतदेह ठेवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. असे मृतदेह शवागराच्या बाहेर ठेवावे लागत आहेत. जिल्हा प्रशासनाने या दोन्ही बाबी गांभीर्याने घेऊन प्राधीकरणच्या स्मशानभूमीमध्ये जादा स्मशानशेड आणि विद्युतदाहिनी उभारण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
नागेश ओरोसकर यांचे दखलपात्र कार्य

या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे फार कठीण काम असते. कारण त्या व्यक्तीच्या रक्ताचे नातेवाईकही पुढे येत नाहीत किंवा पैसे देऊनही कुणी अंत्यसंस्कार करायला बघत नाहीत. मात्र ओरोस येथील कट्टर शिवसैनिक नागेश ओरोसकर यांनी सेवाभावीवृत्तीतून हे काम स्वीकारले. जोखीम स्वीकारत ते अव्याहत हे काम करीत आहेत. प्राधीकरणमधील स्मशानभूमीमध्ये एकच शेड असल्याने अंत्यसंस्कार करताना दिवसभरात चार ते पाचच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे शक्य होते. पाचपेक्षा जास्त मृतदेह असतील, तर दुसऱया दिवशीपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नसतो. अशाही परिस्थितीत काही मृतांच्या नातेवाईकांना अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी रात्री एक वाजताही अंत्यसंस्कार केलेले आहेत. सद्यस्थितीत एकापेक्षा जास्त स्मशानशेड उभारणे आवश्यक आहे. प्रशासनाने ते न उभारल्यास आपली स्वत: पुढाकार घेऊन अतिरिक्त स्मशानशेड उभारण्याची तयारी असल्याचे ओरोसकर यांनी सांगितले.









