बेळगाव / प्रतिनिधी

वॉर्ड क्र. 50 च्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गीता हलगेकर महापालिका निवडणूक लढवीत आहेत. सर्व स्तरातुन पाठिंबा मिळत असून, प्रचाराचा झंझावात सुरू आहे. मात्र मिळणारा पाठिंबा पाहुन विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे प्रचारावेळी कारभारगल्ली भागातील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. पण मोबाईल टॉर्चच्या उजेडात मंगळवारी रात्री प्रचार फेरी काढण्यात आली.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी कंबर कसली आहे. वॉर्ड क्र. 50 मधून अनेक उमेदवारांनी म. ए. समितीमधून निवडणूक लढवित असल्याची घोषणा केली आहे. मात्र या वॉर्डमध्ये गीता हलगेकर यांच्या बाजुने पंच मंडळी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ यांचा कल आहे. वॉर्डमधील सर्व गल्ल्यांमधून पाठिंबा मिळत असून, झंझावाती प्रचार सुरू आहे. प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत. सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून भरघोस मतानी विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गीता हलगेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याने मिळणारा पाठिंबा पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. यामुळे कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने या परिसरात गीता हलगेकर यांची प्रचार फेरी काढण्यात आली. याप्रसंगी प्रचार फेरीत नागरिकांनी गर्दी केली होती. ही बाब रूचली नसल्याने कारभार गल्ली परिसरातील विद्युतपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे या परिसरात अंधार पसरला. पण शिवाजी महाराजांनी अंधारातच विरोधकांना पळताभुई केले होते. त्याप्रमाणेच हलगेकर आणि त्यांच्या समर्थकांनी मोबाईल टॉर्चच्या उजेडात कारभार गल्ली परिसरात फेरी काढून प्रचार केला. नागरीकांपर्यंत पोहोचून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.









