प्रतिनिधी /बेळगाव
महानगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू असून मराठी भाषिक उमेदवारांनी मुसंडी मारली आहे. त्यामुळे मराठी भाषिक उमेदवारांच्या पाठीशी असलेल्या पाठबळामुळे राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. सर्वत्र मराठी भाषिक उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मतदारांचे मनपरिवर्तन करण्यासाठी विकासकामांचा बाऊ करून नागरी समस्यांचे निवारण करण्यासाठी आटापिटा सुरू आहे.
महापालिकेवरील मराठी भाषिकांची सत्ता खाली खेचून पक्षांचे धोरण राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता हरएक प्रकारचा प्रयत्न सुरू असून यासाठी वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली. तसेच वॉर्ड पुनर्रचना करतेवेळी सर्व वॉर्ड फोडण्याचे कृत्य करण्यात आले आहे. तसेच जाणीवपूर्वक कोरोना कालावधीत निवडणुका लादून मराठी भाषिकांना सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच काही वॉर्डांमध्ये मराठी भाषिक उमेदवारांना फुस लावून निवडणूक लढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच मराठी भाषिकांची मते फोडण्याचे राजकारण राजकीय पक्षांनी चालविले आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी वेळीच सावध होवून एकच उमेदवाराला मतदान करण्याची घोषणा प्रचारावेळी करण्यात येत आहे.
राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हावर पहिल्यांदाच महापालिका निवडणूका होत आहेत. त्यामुळे थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. पण शासनाची खेळी लक्षात घेऊन मराठी भाषिकांनी आपली पकड कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. कोरोनाचे संकट आणि राजकीय पक्षांची खेळी हे ध्यानात घेऊन मराठी भाषिक उमेदवारांनी गनिमीकाव्याने प्रचार यंत्रणा राबविली आहे. महापालिका निवडणुकीत मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्याने दगाफटका होण्याची भीती आहे. त्यामुळे जनतेने मराठी भाषिक उमेदवारांच्या पाठिशी ठामपणे राहणे काळाची गरज आहे. सीमावाद असला तरी मराठी भाषिकांनी भाषाभेद केला नाही. कानडी भाषिक, उर्दू भाषिक व मराठी भाषिक गुण्यागोविंदाने राहतात.
मतदार याद्यामधील नांवे गहाळ
मतदार याद्यामधील नांवे गहाळ करण्याचा प्रकार देखील करण्यात आला असून याचा फटका बसण्याची शक्मयता आहे. या समस्यांना मराठी भाषिक उमेदवार तोंड देत आहेत. तसेच घरोघरी जावून मतदारांच्या भेटी घेवून मराठी भाषिक आणि मराठी संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तसेच राष्ट्रीय पक्षांच्या कटकारस्थानाला तोंड देवून प्रचारात मुसंडी मारली आहे. काही वॉर्डांमध्ये मराठी भाषिक उमेदवारांचे एकमत झाले नसल्याने याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी चालविला आहे.
राष्ट्रीय पक्षात काम करणाऱया मराठी भाषिकांचे काही वॉर्डांमध्ये जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सदर उमेदवार म. ए. समितीचा उमेदवार असल्याचे मतदारांकडे सांगून मतांची याचना करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांची खेळी वेळीच ओळखून मतदान करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया मराठी भाषिक नागरिक करीत आहेत. म.ए.समितीसाठी काम करणाऱया आणि मराठी भाषा व मराठी संस्कृतीसाठी झटणाऱया उमेदवारांच्या पाठीशी राहणे मराठी भाषिक जनेतेचे आद्यकर्तव्य आहे.









